अविरोधकांना घेऊन काँग्रेस संसदेत नरेंद्र मोदी सरकारला घेरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 12:35 AM2020-09-06T00:35:44+5:302020-09-06T07:19:52+5:30
११ व १२ सप्टेंबर रोजी काँग्रेस विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावून आपली सामाईक रणनीती अमलात आणण्याची प्रक्रिया निश्चित करणार.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस विरोधी पक्षांसोबत मिळून समान रणनीतीअंतर्गत मोदी सरकारवर हल्ला करील. पहिल्या दिवशीच मोदी सरकारला घेरण्याचे त्याचे प्रयत्न असतील. सरकार ज्या प्रकारे असहमतीचा आवाज दाबून आणि संघराज्य व्यवस्थेवर हल्ला करीत आहे त्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसलेल्या सरकारांसोबत ताळमेळ बसवून सभागृहात आणि बाहेर हल्ला केला जाईल.
११ व १२ सप्टेंबर रोजी काँग्रेस विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावून आपली सामाईक रणनीती अमलात आणण्याची प्रक्रिया निश्चित करणार. जे मुद्दे सभागृहात उपस्थित करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे, त्यात सरकारने आणलेले चार अध्यादेश आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस सभागृहात आवाज उठवणार आहे. त्याची योजना तयार आहे.
लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, पक्षाने स्थापन केलेल्या १० सदस्यांच्या समितीची पहिली बैठक झाली. १४ सप्टेंबर रोजी आधी रणनीती बनवण्यासाठी आणखी चार ते पाच बैठका व्हायच्या आहेत. यादरम्यान समाजवादी पक्ष, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डावे पक्ष यांच्यासह इतर पक्षांशी चर्चा होईल.