"भाजपने माझं म्हणणं खरं ठरवलं"; गुजरातमधल्या दगडफेकीवरुन राहुल गांधी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:24 PM2024-07-03T12:24:02+5:302024-07-03T12:32:23+5:30
Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर झालेल्या दगडफेकीबाबत भाष्य केले.
Gujarat Congress Office Protest : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवरुन लोकसभेत मोठा गोंधळ उडाला. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना हिंदू समाजाबाबत एक विधान केले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन गुजरातमधील अहमदाबाद येथील गुजरात प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पोस्टरला काळे फासले. त्यानंतर मंगळवारी गुजरात काँग्रेस मुख्यालयाबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेकही केली. यावरुन आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला.
अधिवेशनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, गुजरातमध्येही इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले. इंडिया आघाडी तुम्हाला गुजरातमध्ये पराभूत करणार आहे, असेही राहुल गांधीनी म्हटलं होतं. त्याआधी राहुल गांधी यांनी स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारे भाजपवाले हिंसा आणि द्वेष पसरवत आहेत, ते हिंदू असूच शकत नाहीत, असं विधान केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणून हिणवणं अत्यंत गंभीर आहे, असं विधान केलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद गुजरातमध्ये उमटले.
राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये घडलेल्या घटनेनंतर सोशल मिडिया पोस्टमधून भाजपला पुन्हा लक्ष्य केलं. "गुजरात काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड आणि हिंसक हल्ल्याने भाजप आणि संघ परिवाराविषयीचे माझं वक्तव्य खरं ठरवत आहे. हिंसाचार आणि द्वेष पसरवणाऱ्या भाजपच्या लोकांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वेच कळत नाहीत. गुजरातची जनता त्यांच्या खोटेपणावरून स्पष्टपणे पाहू शकते आणि भाजप सरकारला निर्णायक धडा शिकवेल. मी पुन्हा सांगतोय गुजरातमध्ये इंडिया आघाडी जिंकणार आहे!," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
गुजरात कांग्रेस कार्यालय पर हुआ कायरतापूर्ण और हिंसक हमला भाजपा और संघ परिवार के बारे में मेरी बात को और पुख्ता करता है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 3, 2024
हिंसा और नफ़रत फैलाने वाले भाजपा के लोग हिंदू धर्म के मूल सिद्धांतों को नहीं समझते।
गुजरात की जनता उनके झूठ के पार साफ देख सकती है और भाजपा सरकार को निर्णायक…
दरम्यान, गुजरात काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर झालेल्या दगडफेकीनंतर दोन्ही बाजूंच्या अनेक कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पालडी परिसरात घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. शांततापूर्ण आंदोलनावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी हिंसाचार सुरू केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांना जबाबदार धरले.