मोदींविरोधात ‘वज्रमूठ’साठी विरोधक सरसावले; दिल्लीत बैठकांना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 06:30 AM2023-05-23T06:30:17+5:302023-05-23T06:30:58+5:30
नितीश कुमार, तेजस्वी यांनी घेतली खरगे, राहुल गांधींची भेट
- आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांची भेट घेतली. महिनाभरातील या नेत्यांची ही दुसरी बैठक आहे. या बैठकीत पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीची तारीख व रणनीतीबाबत चर्चा झाली. आजच्या चर्चेनंतर विरोधकांच्या ऐक्याबाबत पाटण्यात होणाऱ्या बैठकीची तारीख लवकरच जाहीर होऊ शकते. या बैठकीसोबत एक जाहीर सभाही घेण्याचीही तयारी सुरू आहे.
कर्नाटक निवडणुकीमुळे काँग्रेस पक्षासोबत बैठकीची तारीख व रणनीतीबाबत चर्चा होऊ शकली नव्हती. उद्धव ठाकरे यांच्याशी नितीशकुमार व तेजस्वी यांची पाटण्यातील बैठकीबाबत चर्चा झाली तेव्हा मी या बैठकीला नक्कीच उपस्थित राहीन, असे ठाकरे त्यांना म्हणाले होते.
केजरीवाल यांच्याशी चर्चा
या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच नितीश कुमार यांना हिरवा कंदील दाखवला होता.
नितीश कुमार व तेजस्वी यादव यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासोबतची त्यांची बैठक रविवारी होणार होती.
राहुल यांच्याकडे वेळ होता, पण काँग्रेस अध्यक्ष खरगे कर्नाटकात व्यग्र होते. त्यामुळे सोमवारी ही बैठक झाली.
सर्व विराेधकांना एकत्र आणायचे आहे : शरद पवार
‘मी निवडणूक लढविणार नाही. मात्र, मला सर्व विराेधकांना एकत्र आणायचे आहे. जनतेने साथ आणि शक्ती दिली, तर त्यातून आम्ही पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू. बंगळुरूला गेलाे हाेतो तेथे विविध पक्षांच्या विराेधी पक्षातील नेत्यांची भेट झाली. एकत्र येऊन पुढील धाेरण ठरविणार आहोत,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा काेणी किती लढवायच्या याबाबत चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. तिन्ही पक्षांच्या दाेन सदस्यांनी साेबत बसून चर्चा करावी. काही अडचण आलीच, तर मी, उद्धव ठाकरे, साेनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आम्ही मिळून मार्ग काढू. माध्यमे याबाबत विपर्यास करीत आहेत, असे ते म्हणाले.