बंगळुरुत विरोधकांची दुसरी बैठक; जागा वाटपासह 'या' तीन मुद्द्यांवर होणार चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 08:00 PM2023-07-12T20:00:37+5:302023-07-12T20:07:16+5:30
Opposition Meeting in Bengaluru: विरोधकांच्या गटात आठ पक्षांची वाढ झाली आहे. बंगळुरुतील दुसऱ्या बैठकीत 16 ऐवजी 24 पक्ष एकत्र येणार आहेत.
Opposition Meeting in Bengaluru: केंद्रातील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटत आहेत. यातच आता काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात विरोधी ऐक्याची दुसरी बैठक होणार आहे. पाटण्यात देशातील 16 प्रमुख विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली होती. आता बंगळुरुच्या बैठकीत 3 मोठ्या मुद्द्यांवर चर्चाहोणार आहे.
बंगळुरुतील बैठकीत काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येत आहेत. या दुसऱ्या बैठकीत निवडणुकीची रणनीती आखण्यावर चर्चा होऊ शकते. 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ताज वेस्ट एंड येथे ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत तीन मुद्द्यांवर चर्चा होईल.
1. देशव्यापी पातळीवर मोदी सरकारच्या विरोधात कोणते मुद्दे मांडायचे, कोणत्या मुद्द्यांवर आंदोलन करायचे आणि कोणत्या मुद्द्यांपासून अंतर राखायचे, जेणेकरुन आपापसात वाद होऊ नयेत. राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरुन यापूर्वी शिवसेना (उद्धव गट) आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले होते.
2. विविध विषयांसाठी समित्या किंवा उपसमित्यांच्या स्थापनेवरही चर्चा होईल. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी ऐक्याचे प्रमुख असतील की, शरद पवारांकडे जबाबदारी दिली जाईल, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. अद्याप पंतप्रधान पदासाठी विरोधकांचा चेहरा ठरलेला नाही.
3. लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा जागा वाटवाचा असेल. इतके विरोधक एकत्र येत असल्यामुळे जागेवरुन वाद नक्कीच होईल, पण या वादातून सुवर्णमध्य काढण्यासाठी बैठकीत चर्चा केली जाईल.
विरोधीपक्षांची संख्या वाढणार
एनडीएच्या तुलनेत विरोधी पक्षांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने 17 आणि 18 जुलै रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत 8 नवीन पक्षांना आमंत्रित केले आहे. पाटणा बैठकीत 16 पक्ष आले होते. काँग्रेसने आता 8 नवीन पक्षांनाही निमंत्रित केले आहे. MDMK, VCK, RSP, KDMK, फॉरवर्ड ब्लॉक, IUML, केरळ काँग्रेस (जोसेफ), केरळ काँग्रेस (मणी), या पक्षांचा यात समावेश आहे.
सोनिया गांधी उपस्थित राहू शकतात
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षा सोनिया गांधीही बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहू शकतात, अशी माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. बैठकीच्या तयारीसंदर्भात डीके शिवकुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला होता. मात्र, 10 जनपथच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सोनिया गांधी यांचे बंगळुरुला जाणे, त्यांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे.