विरोधकांची एकजूट फ्लॉप होण्याचे संकेत; पाटण्यात होणाऱ्या बैठकीला मोठे नेते उपस्थित राहणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 07:36 PM2023-06-01T19:36:30+5:302023-06-01T19:39:13+5:30
बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, एमके स्टॅलिन आणि सिताराम येचुरी हे दिग्गज नेते उपस्थित राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
नवी दिल्ली : येत्या 12 जून रोजी पाटणा येथे होणार्या विरोधी पक्षांच्या एकजुटीला धार देणार्या बैठकीला मोठा झटका बसला आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, एमके स्टॅलिन आणि सिताराम येचुरी हे दिग्गज नेते उपस्थित राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे 2024 पूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हादरवण्याचा दावा करणाऱ्या विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जींच्या सल्ल्यानुसार 12 जून रोजी पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला अनेक बडे नेते अनुपस्थित राहणार आहेत. यादरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशात आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्याने बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या जागी पक्षाच्या इतर कोणत्याही प्रतिनिधीचा समावेश केला जाईल. याशिवाय, एमके स्टॅलिन आणि सीताराम येचुरी यांनीही बैठकीला येण्यास असमर्थता व्यक्त केली आहे, याचा अर्थ पाटण्यातील विरोधी एकजुटीचे फ्लॉप शोमध्ये रूपांतर होण्याचे सर्व संकेत मिळत आहेत.
दरम्यान, काँग्रेसने राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे 12 जून रोजी अनुपस्थित असल्यामुळे बैठकीची तारीख 23 जूनपर्यंत पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. मात्र, नितीश कुमार यांनी तारीख वाढवण्यास असमर्थता दर्शवली होती. दुसरीकडे एमके स्टॅलिन आणि सीपीएम नेते येचुरी हेही वेगवेगळ्या कारणांमुळे बैठकीला हजर नाहीत. सुत्रांच्या दाव्यानुसार, सिताराम येचुरी यांना काँग्रेससोबतच्या बैठकीला हजर राहायचे होते, पण राहुल गांधींच्या अनुपस्थितीमुळे ते जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अशा अनेक विरोधाभासांमध्ये विरोधकांच्या एकजुटीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांना एकत्र करण्याच्या मोहिमेत गुंतले आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे आणि नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. तसेच, नितीश कुमार यांनी सर्व नेत्यांची भेट घेऊन या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र या बैठकीवर सावट दिसून येत आहे; यामध्ये कोण कोणत्या पक्षातून येणार? याबाबत अद्याप निश्चित झाले नाही.
दुसरीकडे भाजपचे असे मत आहे की, इंदिरा गांधींचे सदस्यत्व 12 जून 1975 रोजी रद्द करण्यात आले होते, त्यामुळे काँग्रेस हा दिवस अशुभ दिवस मानते. अशा स्थितीत सभेची तारीख बदलावी, अशी काँग्रेसच्या लोकांना आधी इच्छा होती. मात्र नितीश कुमार यांना ते मान्य नव्हते. तसेच, आता नितीश कुमार यांनी मुद्दाम हा दिवस निवडला का? असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.