नागरिकत्व विधेयकाबाबत विरोधकांची भाषा पाकसारखी: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 02:30 AM2019-12-12T02:30:29+5:302019-12-12T02:32:08+5:30
गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न हाणून पाडा
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत विरोधी पक्ष पाकिस्तानप्रमाणे बोलत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या विधेयकाची इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद केली जाईल, असेही ते म्हणाले.
भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत झालेल्या कामकाजाची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना दिली. या बैठकीत मोदी यांनी सांगितले की, ३७० कलम रद्द करण्याइतकेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकही ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. शेजारी राष्ट्रांमध्ये झालेल्या धार्मिक छळामुळे भारतामध्ये स्थलांतरित झालेल्यांना भारतीय नागरिकत्वामुळे कायमचा दिलासा मिळेल. या विधेयकाबद्दल गैरसमज पसरविण्याचे सुरू असलेले प्रयत्न हाणून पाडा, असा आदेश मोदी यांनी भाजप खासदारांना दिला.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मुस्लिमविरोधी व राज्यघटनेतील तरतुदींचा भंग करणारे आहे, असा आरोप काँग्रेस व तृणमूल काँग्रेसने केला होता. विरोधक पाकिस्तानप्रमाणे बोलत आहेत हा मोदींनी लगावलेला टोला या दोन पक्षांसाठीच होता, अशी चर्चा आहे.
ओळख नष्ट करण्याचा डाव : राहुल गांधी
मोदी-शहा यांच्या सरकारने आणलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा ईशान्य भारतातील लोकांची वांशिक ओळख नष्ट करण्याचा डाव आहे. या प्रदेशावर गुन्हेगारी स्वरूपाचा हल्ला आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
ते म्हणाले की, हे विधेयक भारतीय राज्यघटनेवरील घाला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणारे भारताचा पाया खिळखिळा करीत आहेत. ईशान्य भारतातील लोकांच्या पाठी काँग्रेस भक्कमपणे उभी आहे, असेही त्यांनी सांगितले.