अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप, लोकसभेत खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:57 PM2024-07-30T17:57:26+5:302024-07-30T18:38:39+5:30
Parliament Monsoon Session 2024: ज्याच्या जातीचा पत्ता नाही, तो जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहे, असं विधान अनुराग ठाकूर यांनी केलं. अनुराग ठाकूर यांनी हे विधान करताचा सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. त्याचवेळी राहुल गांधीही उठून उभे राहिले आणि अनुराग ठाकूर यांच्यावर प्रतिहल्ला केला
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षात असलेली इंडिया आघाडी यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे. लोकसभेमध्ये आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. यादरम्यान, अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली, माझा अपमान केला, मात्र मला यांच्याकडून माफीही नको आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
आज लोकसभेमध्ये अध्यक्षांच्या आसनावर तालिका सभापती जगदंबिका पाल हे बसलेले असताना ही घटना घडली. त्यावेळी LoP चा संपूर्ण अर्थ लीडर ऑफ अपोझिशन असा होते. लीडर ऑफ प्रोपेगेंडा होत नाही, हे राहुल गांधी यांना माहिती असलं पाहिजे, असं विधान अनुराग ठाकूर यांनी केलं होतं. काँग्रेसने सत्तेवर असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलाय, असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला. तसेच ज्याच्या जातीचा पत्ता नाही, तो जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहे, असं विधान अनुराग ठाकूर यांनी केलं. अनुराग ठाकूर यांनी हे विधान करताचा सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. त्याचवेळी राहुल गांधीही उठून उभे राहिले आणि अनुराग ठाकूर यांच्यावर प्रतिहल्ला केला.
यावेळी महाभारताचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, अध्यक्ष महोदय, जो कुणी दलितांचे प्रश्न उपस्थित करतो त्याला शिव्या ऐकाव्या लागतात. मी या सर्व शिव्या आनंदाने ऐकून घेईन. महाभारताचा विषयच निघाला आहे तर सांगतो की, अर्जुनाला केवळ माशाचा डोळा दिसला होता. आम्हाला जातीनिहाय जनगणन हवी आहे. तसेच आम्ही ती करून घेऊ, त्यासाठी मला कितीही शिव्याशाप ऐकावे लागले तरी चालतील. अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली आहे. मात्र मला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही.
राहुल गांधी यांच्या प्रतिहल्ल्यानंतर सभागृहात पुन्हा गोंधळ वाढला. त्यानंतर अध्यक्षांच्या आसनावर असलेल्या जगदंबिका पाल यांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितले. त्यावेळी अखिलेश यादव यांनी उभे राहत मोर्चा सांभाळला. तसेच राहुल गांधी यांना पाठिंबा देत केंद्र आणि सत्ताधारी भाजपावर टीका केली आणि सभागृहामध्ये कुणाची जात कशी विचारली जाऊ शकते? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर जगदंबिका पाल यांनी सभागृहात कुणीही कुणाची जात विचारणार नाही, अशी सूचना दिली.