BJP मध्ये एकच व्यक्ती पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहू शकतो; राहुल गांधींचे PM मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 03:03 PM2024-07-29T15:03:20+5:302024-07-29T15:03:49+5:30

'21व्या शतकात नवे चक्रव्यूह निर्माण झाले, ज्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी आहेत.'

Parliament Monsoon Session 2024 Only one person in BJP can dream of becoming Prime Minister; Rahul Gandhi's attacks PM Modi | BJP मध्ये एकच व्यक्ती पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहू शकतो; राहुल गांधींचे PM मोदींवर टीकास्त्र

BJP मध्ये एकच व्यक्ती पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहू शकतो; राहुल गांधींचे PM मोदींवर टीकास्त्र

Parliament Monsoon Session 2024 : केंद्रातील मोदी सरकार 3.0 ने संसदेत आपला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अनेक विरोधी नेत्यांनी यावर टीका केली. दरम्यान, आज(29 जुलै)  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शेतकरी, पेपरफुटी, देशात पसरलेली भीती, अर्थसंकल्प आणि कर या मुद्द्यांवरून मोदी सरकारला धारेवर धरले. यावेळी बोलताना राहुल म्हणाले की, 'देशात सध्या भीतीचे वातावरण आहे, ही भीती संपूर्ण देशात पसरली आहे. भाजपमधील लोक आणि मंत्रीही घाबरले आहेत,' असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला.

भाजपमध्ये एकच माणूस पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतो
'गेल्या वेळी मी काही धार्मिक बाबींवर भाष्य केले होते. मी महादेवाच्या अहिंसेबद्दल, त्रिशूळाबद्दल भाष्य केले होते. आपल्या देशातील सर्व धर्म अहिंसेची भाषा बोलतात. घाबरू नका आणि कुणाला घाबरवू नका, असे मी म्हणालो होतो. पण, सध्या देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. माझे मित्र (भाजप खासदार) हसत आहेत, पण मनातून तेदेखील घाबरले आहेत. भाजपची अडचण ही आहे की, त्यांच्या पक्षात फक्त एकच व्यक्ती पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतो. उद्या संरक्षणमंत्र्यांच्या मनात पंतप्रधान बनण्याचा विचार आला, तर मोठी समस्या निर्माण होईल,' अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर नाव न घेता केली.

भाजमधील 'या' सहा लोकांचे चक्रव्यूह...
ते पुढे म्हणतात, 'ही भीती इतक्या वेगाने का पसरत आहे, हा प्रश्न मी स्वतःलाही विचारला. भाजपमधील माझे मित्र, मंत्री, देशातील शेतकरी, कामगार आणि तरुण घाबरले आहेत. मी त्यावर खूप विचार केला. हजारो वर्षांपूर्वी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे चक्रव्यूहमध्ये अभिमन्यूची सहा जणांनी हत्या केली होती. संशोधन केल्यानंतर मला कळले की, चक्रव्यूहचे दुसरे नाव पद्मव्यूह आहे, जे कमळाच्या आकाराचे असते. चक्रव्यूह हा कमळाच्या फुलाच्या आकारात असतो. 21व्या शतकात नवे चक्रव्यूह निर्माण झाले आहे, ज्याचे प्रतीक पंतप्रधान मोदी छातीवर घेऊन फिरतात. ज्या प्रकारे अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला होता, तसाच प्रकार भारत चक्रव्हूहात अडकला आहे. द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वत्थामा आणि शकुनी यांनी अभिमन्यूला घेरुन मारले होते. आजच्या चक्रव्हूहात नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी आहेत.'

पेपरफूटी अन् बेरोजगारीचे चक्रव्यूह
'कोविडच्या काळात सरकारने छोटे उद्योग उद्ध्वस्त केले, त्यामुळे बेरोजगारी वाढली. आता अर्थमंत्री तरुणांसाठी इंटर्नशिप प्रोग्रामबद्दल बोललात. हा बहुधा विनोद असावा. भारतातील 500 कंपन्या या प्रोग्राममध्ये सामील असल्याचे तुम्ही सांगितले. आधी तुम्ही पाय मोडला आणि आता तुम्हीच त्यावर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करत आहात. परीक्षेचा पेपर फुटणे हा आजच्या तरुणांचा मुख्य प्रश्न आहे. एका बाजूला पेपर फुटीचे चक्रव्यूह, तर दुसरीकडे बेरोजगारीचे चक्रव्यूह आहे. दहा वर्षांत 70 वेळा पेपर फुटले, तरुणांना अग्निवीरच्या चक्रव्यूहात अडकवले. या अर्थसंकल्पात अग्निवीर जवानांच्या पेन्शनसाठी एक रुपयाही नाही. तुम्ही शेतकऱ्यांना एमएसपीचा अधिकार देत नाही,' अशी टीकाही त्यांनी केली. 

देशात 'टॅक्स' दहशतवाद, चक्रव्यूह...; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल

Web Title: Parliament Monsoon Session 2024 Only one person in BJP can dream of becoming Prime Minister; Rahul Gandhi's attacks PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.