संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक, नरेंद्र मोदींची असेल उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 10:36 AM2021-07-18T10:36:48+5:302021-07-18T10:37:08+5:30
Parliament Monsoon Session: अधिवेशनात विरोधक महागाई, तेलाच्या वाढत्या किमती, कोरोना लसींचा अभाव, शेतकरी आंदोलन, राफेल करार, भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षा मुद्दय़ांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.
नवी दिल्ली: उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार, 18 जुलै) सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्र सरकारने सकाळी 11 वाजता आणि लोकसभा अध्यक्षांनी सायंकाळी चार वाजता लोकसभेत सर्व पक्षांच्या नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. त्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचीही उपस्थिती असेल. या बैठकीत पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सरकार विरोधी पक्षांकडून सहकार्याची मागणी करेल. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीसाठी सर्व पक्षांना आमंत्रित केले आहे.
सोमवारपासन सुरू होणारे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यादरम्यान, विरोधक महागाई, तेलाच्या वाढत्या किमती, कोरोना लसींचा अभाव, शेतकरी आंदोलन, राफेल करार, भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षा मुद्दय़ांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर या अधिवेशनात तीन अध्यादेशांसह एकूण 23 विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यापैकी 17 नवीन विधेयकं आहेत.
यापूर्वी शनिवारी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि व्ही मुरलीधरन होते. सोमवारीपासून सुरू होणा पावसाळी अधिवेशनाबाबत बिर्ला आणि मंत्र्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. काल एकूण आठ केंद्रीय मंत्र्यांनी सभापतींची भेट घेतली होती. त्यापैकी निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि पंकज चौधरी हे होते.