'संसदेत घुसखोरी झाली, तेव्हा भाजपा खासदार पळून गेले', राहुल गांधींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 02:48 PM2023-12-22T14:48:14+5:302023-12-22T14:49:43+5:30

खासदारांच्या निलंबनाविरोधात आज INDIA आघाडीने दिल्लीतील जंतर-मंतरवर निदर्शने केली.

Parliament Security Breach Congress Protest 'When those youths entered the Parliament, the BJP MPs ran away', Rahul Gandhi slams | 'संसदेत घुसखोरी झाली, तेव्हा भाजपा खासदार पळून गेले', राहुल गांधींचा खोचक टोला

'संसदेत घुसखोरी झाली, तेव्हा भाजपा खासदार पळून गेले', राहुल गांधींचा खोचक टोला

Parliament Security Breach Congress Protest ( Marathi News ) : संसदेचे हिवाळी अधिवेशन संपले, पण खासदारांच्या निलंबनावरुन संघर्ष सुरुच आहे. या विरोधी India आघाडी आज देशभरात निषेध करत आहे. राजधानी दिल्लीतील जंतरमंतर ( Jantar-Mantar ) येथे मुख्य निदर्शने करण्यात आली. सर्व विरोधी पक्षांचे नेत्यांनी एकत्र येत सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

देशात तीव्र बेरोजगारी
संसद सुरक्षेतील त्रुटीचा ( Parliament Security Breach ) मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, 'हा मुद्दा संसदेच्या सुरक्षेचा आहे, पण त्या तरुणांनी हे कृत्य का केले? याचे कारण बेरोजगारी आहे. देशात तीव्र बेरोजगारी आहे, त्यामुळे तरुणांना रोजगार मिळू शकत नाहीय. मी एक छोटासा सर्व्हे करायला सांगितला होता. भारतीय तरुण दिवसातील किती तास मोबाईल फोनवर घालवतात, ते शोधण्यास सांगितले होते. यातून असे समजले की, देशातील तरुण दिवसाचे साडेसात तास फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, मेल, म्हणजे स्मार्टफोनवर घालवतोय. याचा अर्थ मोदी सरकारच्या काळात त्यांना रोजगार मिळालाच नाही. यामुळे त्या तरुणांनी संसदेच्या सभागृहात प्रवेश केला.'

संसदेच्या सुरक्षेबाबत सरकारला घेरले
खासदारांच्या निलंबनाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी दोन-तीन तरुणांनी संसद भवनात उड्या मारल्या, आम्ही सर्वांनी त्यांना उडी मारताना पाहिले. ते आत आले, धुराच्या नळकांड्या फोडल्या, यावेळी भाजपचे सर्व खासदार पळून गेले. जे स्वतःला देशभक्त म्हणवतात, त्यांची हवा टाईट झाली.'

'त्या तरुणांनी संसदेत इतके मोठे कृत्य करणाचे कारण देशातील बेरोजगारी आहे. याबाबत आम्ही गृहमंत्र्यांशी प्रश्न विचारला, तर त्यांनी दीडशे खासदारांची हकालपट्टी केली. प्रत्येक खासदार लाखो मते घेऊन येतो, तुम्ही 150 लोकांचा अपमान केला नाही, तर 60 टक्के भारतातील लोकांना गप्प केले. तुम्ही अग्निवीर योजना आणली आणि तरुणांच्या मनातून देशभक्तीची भावना निघून गेली. अग्निवीरच्या विरोधात तरुण उभे राहिले, तेव्हा सरकारी नोकरी मिळणार नाही, असा दम दिला. आम्ही सर्व विरोधी पक्षाचे नेते एकत्र आहोत. ही लढाई द्वेष आणि प्रेम यांच्यात आहे. आम्ही द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडतोय. तुम्ही जितकं लोकांना घाबरवाल, तितकी इंडिया आघाडी मजबूत होईल,' असंही राहुल यावेळी म्हणाले.

Web Title: Parliament Security Breach Congress Protest 'When those youths entered the Parliament, the BJP MPs ran away', Rahul Gandhi slams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.