"हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 06:31 PM2024-07-02T18:31:38+5:302024-07-02T18:32:43+5:30

"काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात आहे. बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी नेहरुंनी आपली सर्व शक्ती वापरली. पहिल्याच निवडणुकीत षड्यंत्र रचून त्यांचा पराभव केला."

Parliament Session 2024 : "Insulting Hindu culture has become a fashion; now society should think"- PM Modi | "हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?

"हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?

Parliament Session 2024 : संसदेच्या विशेष अधिवेशनात आज(दि.2) पंतप्रधान मोदी (Narendra Modi) विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. "2014 चे दिवस आठवले तर देशातील जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला होता. देश पार निराशेच्या गर्तेत बुडाला होता. देशाचे काहीही होऊ शकत नाही, हेच शब्द 2014 पूर्वी कानावर पडायचे. दररोज वृत्तपत्रांमध्ये फक्त घोटाळ्यांच्या बातम्या यायच्या. घोटाळ्यांची जणू स्पर्धाच सुरू होती. या देशाने दीर्घकाळ तुष्टीकरणाचे राजकारण पाहिले आणि प्रशासनाचे तुष्टीकरण मॉडेलही पाहिले आहे, " अशी घणाघाती टीका पतप्रधानांनी केली.


  
आम्ही सैन्यासाठी काम करत आहोत 

पीएम मोदी म्हणाले, "लष्कराचे आधुनिकीकरण करण्यासाठी आम्ही सुधारणा करत आहोत. युद्धकाळात सैन्यात थिएटर कमांड आवश्यक असते. सीडीएस झाल्यानंतर मी समाधानाने सांगू शकतो की थिएटर कमांडच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. सक्षम सैन्य तयार करण्यासाठी सुधारणा केल्या जात आहेत. वेळीच सुधारणा न केल्यामुळे लष्कराचे खूप नुकसान झाले, पण या सर्व गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत आणि म्हणूनच मी तोंड बंद करुन बसलो आहे. संसाधने बदलत आहेत, शस्त्रास्त्रे बदलत आहेत, तंत्रज्ञान बदलत आहे. अशा स्थितीत लष्कराला बळकटी देण्याची गरज आहे. अशा वेळी आम्ही शांतपणे सैन्यासाठी आमचे काम करत आहोत. काँग्रेस काय करत आहे, तर खोटी माहिती पसरवत आहे. काँग्रेसचे लोक कधीही भारतीय सैन्याला मजबूत होताना पाहू शकत नाहीत." 

काँग्रेसने सैन्य कमकुवत केले
"नेहरूजींच्या काळात देशाची शक्ती किती कमकुवत होती. देश स्वतंत्र झाल्यापासून त्यांनी भ्रष्टाचाराची परंपरा निर्माण केली. जीप घोटाळा असो, पाणबुडी घोटाळा असो, बोफोर्स घोटाळा असो, या सर्व घोटाळ्यांमुळे लष्कराची ताकद वाढली नाही. एक काळ असाही होता, जेव्हा काँग्रेसच्या काळात आपल्या सैन्याकडे बुलेटप्रूफ जॅकेटही नव्हती. सत्तेत असताना विरोधात जाऊनही सेना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू होते. काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी लढाऊ विमाने खरेदी केली नाहीत, पण आम्ही केली. ही लढाऊ विमाने हवाई दलापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी काँग्रेसने सर्व प्रकारचा कट रचला. लष्कराला बळ देणाऱ्या प्रत्येक सुधारणांना काँग्रेसचा विरोध आहे. तरुणांची ऊर्जा हीच लष्कराची मोठी ताकद आहे, हे आता काँग्रेसला कळून चुकले आहे. माझ्या देशातील तरुणांनी सैन्यात भरती होऊ नये, असे सैन्य भरतीबाबत खोटे बोलले जात आहे," अशी टीका मोदींनी केली. 

काँग्रेसने दलितांवर अन्याय केला
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "संविधानाच्या मुद्द्यावरुनही काँग्रेस नेहमीच देशवासीयांशी खोटं बोलत आहे. मला नम्रपणे देशवासियांसमोर सत्य मांडायचे आहे. देशवासीयांनीही हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणीबाणीचे हे 50 वे वर्ष आहे. आणीबाणी ही सत्तेच्या लालसेपोटी देशावर लादलेली हुकूमशाही होती. काँग्रेसने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. सरकार पाडणे, प्रसारमाध्यमांना दडपून टाकणे, प्रत्येक कृती संविधानाच्या भावनेच्या, संविधानाच्या प्रत्येक शब्दाविरुद्ध होती. या लोकांनी देशातील मागासवर्गीय आणि दलितांवर घोर अन्याय केला. याच कारणामुळे काँग्रेसच्या दलित-मागास विरोधी मानसिकतेमुळे बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरुंजींच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. नेहरुंजींनी दलित आणि मागासवर्गीयांवर कसा अन्याय केला ते त्यांनी उघड केले होते."

काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात
"मंत्रिमंडळाचा राजीनामा देताना बाबासाहेबांनी दिलेली कारणे त्यांची मानसिकता दर्शवतात. अनुसूचित जातीच्या दुर्लक्षामुळे आपला राग आवरता आला नाही, असे बाबासाहेब म्हणाले होते. बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी नेहरुंजींनी आपली सर्व शक्ती वापरली. पहिल्याच निवडणुकीत षड्यंत्र रचून त्यांचा पराभव झाला. इतकंच नाही तर हा पराभव साजरा करत आनंद व्यक्त केला. हा आनंद एका पत्रात लिहिला आहे. बाबासाहेबांप्रमाणेच दलित नेते बाबू जगजीवन राम यांनाही त्यांचा हक्क मिळाला नाही. आणीबाणीनंतर जगजीवन राम पंतप्रधान होण्याची शक्यता होती. इंदिरा गांधींनी जगजीवन राम कोणत्याही किंमतीत पंतप्रधान होऊ नयेत याची काळजी घेतली. काँग्रेसने चौधरी चरणसिंग यांनाही तशीच वागणूक दिली. मागासवर्गीय नेते, काँग्रेसचे अध्यक्ष आणि बिहारचे सुपुत्र सीताराम केशरी यांचा अपमान करण्याचे कामही याच काँग्रेसने केले. काँग्रेस हा आरक्षणाचा कट्टर विरोधक आहे. नेहरूजींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आरक्षणाला स्पष्ट विरोध केला होता. इंदिरा गांधींनी मंडल आयोगाचा अहवाल वर्षानुवर्षे राखून ठेवला होता. राजीव गांधी विरोधी पक्षात असताना त्यांचे सर्वात मोठे भाषण आरक्षणाच्या विरोधात होते, जे आजही संसदेच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे."

हिंदूंचा अपमान हा योगायोग की...
"आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल जे काही घडले, त्याला देशातील कोट्यवधी जनता शतकानुशतके माफ करणार नाही. 131 वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदजींनी शिकागो येथे म्हटले होते की, मला अभिमान आहे की, मी अशा धर्मातून आलो आहे, ज्याने संपूर्ण जगाला सहिष्णुता आणि जागतिक स्वीकाराची शिकवण दिली आहे. विवेकानंद यांनी शिकागो येथे जगातील दिग्गजांसमोर हिंदू धर्माची बाजू मांडली होती. हिंदूंमुळेच भारताची विविधता वाढली आहे आणि बहरत आहे. आज हिंदूंवर खोटे आरोप करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, ही गंभीर बाब आहे. हिंदू हिंसक आहेत, असे म्हटले जात आहे. ही तुमची मूल्ये, तुमचे चारित्र्य, तुमची विचारसरणी, तुमचा द्वेष आहे. देशातील हिंदूंच्या विरोधात या कारवाया, हा देश शतकानुशतके विसरणार नाही. हेच लोक आहेत, ज्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला होता. त्यांच्या मित्रांनी हिंदू धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या शब्दांशी केली होतो. सुनियोजित कटाचा एक भाग म्हणून, त्यांच्या संपूर्ण परिसंस्थेने हिंदू परंपरेचा अपमान आणि खिल्ली उडवण्याची फॅशन बनवली आहे. सभागृहातील कालचे दृश्य पाहिल्यानंतर हा अपमान हा योगायोग आहे की, मोठ्या प्रयोगाची तयारी आहे, याचा विचार आता हिंदू समाजाला करावा लागेल", असेही मोदी यावेळी म्हणाले.

संबंधित बातमी- "2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

संबंधित बातमी- "मतदारांनी काँग्रेसलाही जनादेश दिला, तो विरोधी बाकावर बसण्याचा", PM मोदींची बोचरी टीका...

Web Title: Parliament Session 2024 : "Insulting Hindu culture has become a fashion; now society should think"- PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.