'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 04:08 PM2024-07-01T16:08:37+5:302024-07-01T16:09:12+5:30

'सरकारने जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतला. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्याठी मणिपूरचे अस्तित्वच नाही.'

Parliament Session: 'I write, I will defeat you in Gujarat', Rahul Gandhi's attack on bjp from Lok Sabha | 'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान

'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान

Parliament Session : आज 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. दरम्यान, आज सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसाचार पसरवतात, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल यांनी केली. याशिवाय, अग्नीवीर योजना, NEET परीक्षेतील गोंधळ, इनकम टॅक्स-ईडीच्या धाडी, मणिपूर हिंसाचार, जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा, अशा विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

लिहून ठेवा, गुजरातमध्ये तुमचा पराभव करणार
राहुल गांधी म्हणाले की, इनकम टॅक्स आणि ईडी सर्व लहान व्यावसायिकांच्या मागे लागले आहेत, जेणेकरून अब्जाधीशांचा मार्ग मोकळा होईल. मी गुजरातला गेलो, तेव्हा कापड उद्योगातील लोकांनी मला सांगितले की, जीएसटी अब्जाधीशांचा मार्ग मोकळा करण्यासाठी आणला आहे. लिहून ठेवा, आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये तुमचा पराभव करणार, असे आव्हान राहुल यांनी भाजपला दिले.

'संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब', राहुल गांधींच्या वक्तव्यावर PM मोदींचा पलटवार

मणिपूर त्यांच्यासाठी अस्तित्वात नाही
सरकारने जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतला. भारतात पहिल्यांदा असे घडले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याठी मणिपूरचे तर काही अस्तित्वच नाही. आम्ही मणिपूरला जाण्याचे पंतप्रधानांना आवाहन केले, पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले, रोजगार संपवला. आता NEET परीक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. संपूर्ण परीक्षा श्रीमंत मुलांसाठी केली जाते. हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत असून, तुम्ही तयार केलेले 70 पेपर फुटलेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पेपरफुटीबाबत किंवा अग्निवीरबाबत कोणतीही चर्चा होत नाही. आम्ही एक दिवसाच्या चर्चेची मागणी केली, तर सरकारने नकार दिला, अशी टीकाही त्यांनी यावेली केली.

तुम्ही शेतकऱ्यांशी बोलत नाही, त्यांना दहशतवादी म्हणता
राहुल पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी आम्ही जे भूसंपादन विधेयक तयार केले होते, ते तुम्ही रद्द केले. शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठी तीन नवीन कायदे आणले, हे अंबानी-अदानींच्या फायद्याचे कायदे होते. शेतकरी रस्त्यावर आले, तुम्ही शेतकऱ्यांशी बोलतही नाही, तुम्ही त्यांना जवळ घेतले नाही. उलट त्यांनाच दहशतवादी घोषित केले. तुम्ही मृत शेतकऱ्यांसाठी मौन पाळले नाही. सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, शेतकऱ्यांना एमएसपी दिली नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Web Title: Parliament Session: 'I write, I will defeat you in Gujarat', Rahul Gandhi's attack on bjp from Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.