इंधन दरवाढीने जनता झाली त्रस्त, रेल्वेच्या भाडेवाढीचीही चर्चा; राहुल गांधी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:07 AM2021-02-24T01:07:18+5:302021-02-24T06:50:10+5:30
लोकनियुक्त सरकार पाडण्यात भाजपला रस
नवी दिल्ली : मोदी सरकार पेट्राेल व डिझेलचे भाव रोजच्या रोज वाढवत असून, आता ऱेल्वे तिकिटांच्या दरातही दुप्पट वाढ केली जाणार असल्याचे वृत्त आहे. सर्वसामान्यांचे जगणे अवघड करण्याची आणि त्यांची रोजीरोटी हिसकावण्याची तयारीच भाजपने चालवली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.
रेल्वे लवकरच तिकिटांच्या दरात दुप्पट वाढ करणार असल्याचे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे. त्या बातमीचा उल्लेख करीत राहुल गांधी यांनी, आता मोदी सरकार सामान्यांना जगू देणार की नाही, असा सवाल केला आहे. कोरोनामुळे देशातील जनता आधीच आर्थिक अडचणीत असताना, रेल्वेची भाडेवाढ करून, स्वत:चे उत्पन्न वाढविण्याचा हा मार्ग अयोग्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
न्यायपालिकेवरही दबाव
पुडुच्चेरीमधील काँग्रेस सरकार सोमवारी बहुमताअभावी कोसळले. त्याआधी तेथील काँग्रेस व द्रमुकच्या काही आमदारांनी राजीनामा दिला होता. त्याचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, लोकनियुक्त सरकारे पाडण्याचा चंगच मोदी सरकारने बांधलेलाआहे.
जे विजयी झाले, त्यांना अशा पद्धतीने पराभूत करायचे आणि स्वत:चा पराजय झाला तरी याचप्रकारे विजय मिळवायचा, असा डावच भाजपने रचला आहे.लोकसभा व राज्यसभेतही आता विरोधी खासदारांना बोलू दिले जात नाही आणि आता तर न्यायपालिकेवरही भाजप व मोदी सरकार दबाव आणत आहे, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला.