"कदाचित अमित शहांना माहिती देणारे अभ्यास करुन आले नसावेत", खा. सुळेंचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:39 AM2023-08-10T11:39:44+5:302023-08-10T12:13:26+5:30
यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका येथील परशुराम बांदूरकर यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती
मुंबई/यवतमाळ : काँग्रेस नेते राहुल गांधी १५ वर्षांपूर्वी २००८ मध्ये विदर्भ दौऱ्यावर आले असता त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी कलावती बांदूरकर यांच्या झोपडीला भेट देऊन आत्महत्येमागील परिस्थिती जाणून घेतली होती. संसदेत कलावतीचा विषय निघाल्याने राहुल गांधींची ती भेट पुन्हा चर्चेत आली. या भेटीनेच कलावतीचे आयुष्य बदलून टाकले. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कलावतीचा उल्लेख संसदेत करताना मोदी सरकारमुळेच त्यांना मदत मिळाल्याचं म्हटलं. पण, आपणास काँग्रेसमुळेच मदत मिळाल्याचं स्वत: कलावती यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर, आता खासदार सुप्रिया सुळेंनी अमित शहांना चिमटा काढला आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका येथील परशुराम बांदूरकर यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या या घटनेनंतर २००८ मध्ये राहुल गांधी विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी अचानक जळका गावी जाऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी कलावती यांच्या झोपडीवजा घराला भेट देऊन सांत्वन केले. त्यांच्या घरी चहाही घेतला. त्यानंतर दिल्लीला परतल्यावर लोकसभेच्या सभागृहात राहुल यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची व्यथा सभागृहात मांडत कलावतीचा मुद्दा उपस्थित केला. संसदेतील या चर्चेने कलावती देशभरात प्रकाशझोतात आल्या होत्या. तर, त्यांना मदतीचा ओघही सुरू झाला होता.
संसदेत सध्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असून मणिपूर हिंसाचारामुळे महिलांच्या मुद्द्यावरुन चर्चा झडत आहेत. त्यावर, बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत कलावतींना मोदी सरकारमुळेच मदत मिळाल्याचं म्हटलं. त्यानंतर, मीडियाशी बोलताना कलावती यांनी स्वत: हे ऐकून वाईट वाटल्याचं म्हटलं आहे. तसेच, काँग्रेस काळातच मला मदत मिळाली, मोदींच्या काळात काहीच नाही, असेही स्पष्ट केले. त्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन अमित शहांना लक्ष्य केलं.
मंत्रीमहोदयांनी सभागृहात बोलताना संपूर्ण माहिती घेऊन बोलणे अपेक्षित असते. कदाचित केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांना माहिती देणारे नीट अभ्यास करुन आलेले नसावेत. मंत्रीमहोदयांनी आपली सुत्रे तपासून घ्यायला हवीत, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. दरम्यान, सुप्रिया यांनी गृहमंत्र्यांना टोला लगावला, तर अभ्यास शब्द वापरत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेही त्यांचा रोख असल्याचं दिसून येत आहे.
काय म्हणाल्या कलावती
बुधवारी सभागृहात माझ्या अनुषंगाने पुन्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघाल्याचे समजले. माझा मुलगा प्रीतम यानेही मला चर्चेबाबत सांगितले. ऐकून वाईट वाटले. खरे तर राहुल गांधी यांच्या भेटीनंतरच माझे आयुष्य रुळावर आले. जे काही मिळाले ते २०१४ पूर्वीच मिळाल्याचे कलावती यांनी सांगितले. प्रीतम याचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण झाले असून तो वणी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्यानेही राहुल गांधी यांच्या भेटीनंतर कुटुंबामध्ये झालेला बदल कथन केला.
असं बदललं कलावतींचं आयुष्य
राहुल गांधींनी भेट घेतल्यानंतर कलावती यांच्यासाठी विविध स्तरांतून मदतीचा ओघही सुरू झाला. सुलभ इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी तातडीने कलावतींच्या जळका गावी जाऊन भेट घेतली आणि ३६ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीतून कलावतीने कर्जाची परतफेड तर केलीच. शिवाय उरलेली रक्कम बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवली आणि यातून मिळणाऱ्या पैशांवर सात मुली आणि दोन मुले अशा मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. एवढेच नव्हे तर याच पैशातून तिने मुलींची लग्न आणि मुलांचे शिक्षणही पूर्ण केले.
या भेटीनंतरच काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही कलावतीची भेट घेऊन शासकीय योजनेतून कलावतीला घरकुल, वीजजोडणी, पिण्याच्या पाण्याचा नळ, टिनपत्रे अशी मदत केली होती. राहुल गांधी यांच्यामुळेच मला जगण्याचा मार्ग मिळाल्याचे कलावती आवर्जून सांगतात.