पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:48 PM2021-10-24T12:48:56+5:302021-10-24T12:49:17+5:30
Petrol-Diesel price Hike: काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितल्यानुसार, 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे.
नवी दिल्ली: वाढत्या महागाईविरोधात विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत. यातच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविरोधात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारला टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, 'पेट्रोलच्या किमतींवरील कर वाढत आहे. कुठे निवडणुका असतील तर कर कमी होईल,'असे राहुल गांधी म्हणाले.
पेट्रोल दामों पर टैक्स डकैती बढ़ती जा रही है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 24, 2021
कहीं चुनाव हों तो थोड़ी रोक लगे।#TaxExtortion
इंधनाच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेसने मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात पक्ष 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान मोठे आंदोलन करणार आहे. काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींच्या वाढीविरोधात आंदोलन करणार आहोत, 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात मोहीम राबवू.
काँग्रेस नेते करणार 'पदयात्रा'
वेणुगोपाल पुढे म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी आपापल्या भागात 'पदयात्रा' काढण्याचाही कार्यक्रम आहे. या 15 दिवसांमध्ये संपूर्ण काँग्रेस समित्या देशभरातील त्यांच्या भागात एक आठवडा 'पदयात्रा' करतील. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही इंधन दरवाढीवर केंद्र सरकारवर हल्ला चढवला आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने सुचवल्याप्रमाणे कर कमी केले पाहिजेत असे सांगितले.
सलग चौथ्या दिवशी भाव वाढ
शनिवारी देशभरात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले. दिल्लीत पेट्रोलची किंमत 107.24 रुपये प्रति लीटर, तर डिझेलची किंमत 95.97 रुपये प्रति लीटर झाली. याशिवाय मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 113.12 आणि 104.00 रुपये प्रति लीटर आहे. इतर शहरांची स्थितीही वाईट असून, किंमतींबाबत परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे.