Pm Modi vs Rahul Gandhi: "पंतप्रधान मोदींनी केलं तर चालतं अन् राहुल गांधींना..."; काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांनी घेतला BJPचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 10:08 PM2022-12-28T22:08:49+5:302022-12-28T22:09:42+5:30
केंद्रातील सरकार खोटं बोलणारं असल्याचाही केला आरोप
Pm Modi vs Rahul Gandhi, Mallikarjun Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (२८ डिसेंबर २०२२) पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे केंद्र सरकारची खूप अडचण असल्याचे खरगे म्हणाले. "भारत जोडो यात्रा म्हणजे भाजपाने देशात निर्माण केलेल्या द्वेषाच्या वातावरणाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न आहे. पण सरकार आता त्यांना घाबरले आहे. म्हणूनच राहुल गांधींना नोटीस पाठवण्यात आली होती की, कोविड-19 मुळे असे कार्यक्रम होऊ देऊ नका. पण असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी तसं केलं तर चालतं, आणि राहुल गांधींच्या भारत जोडोला मात्र विरोध," अशा शब्दांत मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.
लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा!
"भाजपाकडे खूप मोठे वॉशिंग मशीन आहे, जे मोठे डागही साफ करू शकते. लोकांना या मशीनमध्ये टाकल्यावर ते स्वच्छ बाहेर येतात. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. हे केंद्रातील खोटे बोलणारे सरकार आहे. देशाच्या मूळ भावना आणि तत्त्वांवर सातत्याने आघात होत आहेत. देशभरात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे, मात्र सरकार या प्रश्नांकडे अजिबात लक्ष देत नाही. या प्रश्नांकडे आणि समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारत जोडो यात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे", असे आवाहन खर्गे यांनी केले.
त्याचवेळी, काँग्रेस पक्षाने स्थापना दिनानिमित्त त्यांच्या अधिकृत हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या संघर्षांचा इतिहास आणि दशकांनंतरही ती कशी मजबूत आहे, हे सांगितले आहे. काँग्रेसची विचारधारा कालही देशासाठी खूप महत्त्वाची होती आणि आजही महत्त्वाची आहे. काल याच विचारसरणीच्या बळावर आम्ही इंग्रजांना हुसकावून लावत आमच्या हक्काची लढाई जिंकली, आजही याच विचारसरणीच्या बळावर देशातून अन्याय, द्वेष संपवू, अशा आशयाचा संदेश यातून देण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १३७ वर्षांपूर्वी २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई शहरात झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी पक्ष २८ डिसेंबर रोजी आपला स्थापना दिवस साजरा करत आहे.