तुम्ही माझ्यावर स्ट्राईक करा, मी दहशतवाद्यांवर स्ट्राईक करतो - मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 03:41 PM2019-03-05T15:41:37+5:302019-03-06T11:54:52+5:30
एकीकडे विरोधी पक्ष मोदी हटावचे नारे देत असताना लोकांच्या बळावर मी लोकहिताचे निर्णयावर ठाम आहे. ते मोदीवर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात तर मोदी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाला लगावला.
गांधीनगर - एकीकडे विरोधी पक्ष मोदी हटावचे नारे देत असताना लोकांच्या बळावर मी लोकहिताच्या निर्णयावर ठाम आहे. ते मोदीवर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात तर मोदी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाला लगावला. गुजरातच्या गांधीनगर येथे असंघटीत कामगारांसाठी पेन्शन योजनेचा शुभारंभ करताना नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाला लक्ष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरातच्या गांधीनगर येथून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ केला. श्रमिक आणि मजूर अशा असंघटीत कामगारांसाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. या योजनेतंर्गत 60 वर्षावरील असंघटीत कामगारांना 3 हजार रूपये मासिक निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेचा जवळपास देशातील 10 करोड श्रमिक कामगारांना लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ करत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी 11 लाख 51 हजार लाभार्थ्यांना 13 करोड 58 लाख 31 हजार रक्कम थेट पेन्शन खात्यात जमा केली.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली, ते म्हणाले की, ज्यांच्यासाठी गरीब फक्त फोटो काढण्यासाठीचा खेळ आहे, ज्यांना गरिबांच्या दुखा:शी काही देणंघेणं नाही त्यांची मानसिक अवस्था गरीब आहे. आमच्यासाठी गरीबी ही मोठे आव्हान आहे. कोणीही कितीही गरीब असो वा अशिक्षित असो या योजनेचा लाभ त्याला सहजरित्या होऊ शकतो. ज्या श्रमिक कामगारांचे वय 18 ते 40 या वयोगटात आहे. त्यांचे मासिक मानधन 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे अशाही कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गेली 55 वर्षे गरिबांच्या नावे मते मिळवणाऱ्यांनी देशावर राज्य केले मात्र अशा असंघटीत कामगारांसाठी कोणत्याही योजना लागू करण्याची त्यांची इच्छा नव्हती असा टोला मोदी यांनी काँग्रेसला लगावला.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी श्रमिक कामगारांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. डिजिटल इंडियामुळे काही मिनिटांतच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल, 2014 पूर्वी देशभरात 80 हजार सुविधा केंद्र होते मात्र आमचं सरकार आल्यापासून देशभरात 3 लाखांहून अधिक केंद्र उभारली गेली. आता हीच केंद्र श्रमिक कामगारांना उपयोगी पडणार आहेत. असा दावा पंतप्रधानांनी केला.