देशाला लाज आणली; महिला सुरक्षेवरुन राहुल गांधींचा मोदींवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 06:03 PM2018-06-26T18:03:39+5:302018-06-26T18:05:56+5:30
महिलांवर अत्याचार होत असताना मोदी व्यायामात मग्न असल्याची टीका
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणीबाणीवरुन काँग्रेसवर हल्ले चढवत असताना आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी महिलांच्या सुरक्षेवरुन मोदींवर तोफ डागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अंगणात व्यायाम करण्यात मग्न आहेत आणि महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत देशाची अवस्था अफगाणिस्तान, सीरिया आणि सौदी अरेबियापेक्षा वाईट झाली आहे, असं ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
महिला सुरक्षेच्याबाबत भारताची स्थिती जगात सर्वात वाईट असल्याचं थॉमसन रॉयटर्सच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. याच सर्वेक्षण अहवालावरुन राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं. 'आमचे पंतप्रधान त्यांच्या अंगणात पायांच्या बोटांवर उभे राहतात. मात्र ते महिला सुरक्षेचा विषय टाळतात. बलात्कार आणि महिलांच्या सुरक्षेबाबत भारताची अवस्था अफगाणिस्तान, सीरिया आणि सौदी अरेबिया यांच्यापेक्षाही वाईट आहे. यामुळे देशाला लाज आणली आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
While our PM tiptoes around his garden making Yoga videos, India leads Afghanistan, Syria & Saudi Arabia in rape & violence against women. What a shame for our country! https://t.co/Ba8ZiwC0ad
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 26, 2018
राहुल यांनी ट्विटसोबतच एक वृत्तदेखील शेयर केलं आहे. लैंगिक हिंसाचार, गुलामी यांच्याबाबतीत भारताची स्थिती चिंताजनक असल्याचं वृत्त राहुल यांनी शेयर केलं आहे. थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशननं मंगळवारी महिला सुरक्षेबद्दलचा अहवाल प्रसिद्ध केला. 550 तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे. घरगुती हिंसाचार, जबरदस्तीनं केले जाणारे विवाह यासारख्या बाबतीत भारतातील महिलांची स्थिती चिंताजनक असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.