'दोन कायद्यांनी देश चालू शकत नाही', समान नागरी कायद्याबाबत पीएम मोदी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 02:31 PM2023-06-27T14:31:22+5:302023-06-27T14:52:21+5:30
PM Modi in Bhopal: पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावरुन समान नागरी कायद्याचा उल्लेख केला.
PM Modi On UCC: पीएम मोदींनी मंगळवारी (27 जून) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 'मेरा बूथ सबसे मजबूत' या कार्यक्रमांतर्गत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी समान नागरी कायद्याबाबत(UCC) मोठे विधान केले आहे. 'दोन कायद्यांनी घर चालू शकत नाही, त्याचप्रमाणे देशही दोन कायद्याने चालू शकत नाहीत,' असे विधान मोदींनी केले.
'दोन कायद्यांनी देश...'
यावेळी पंतप्रधान मोदींनी समान नागरी कायद्याबाबत आपले मत मांडले. 'भारताच्या संविधानात नागरिकांच्या समान अधिकारांवर जोर दिला आहे. विरोधक आमच्यावर आरोप लावतात, पण मूळात हेच लोक मुसलमान-मुसलमान करतात. यांनी मुस्लिमांच्या हिताचे निर्णय घेतले असते, तर आज बहुतांश मुस्लिम लोक शिक्षणात मागे राहिले नसते, रोजगारात मागे राहिले नसते, अडचणीचे जीवन जगत राहिले नसते. सुप्रीम कोर्टाने अनेकदा समान नागरी कायदा आणा, असे म्हटले आहे. पण, विरोधक फक्त व्होट बँकेचे राजकारण करतात,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
विरोधकांवर जोरदार टीका
यावेळी मोदींनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. 'पाटण्यातील बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली. घोटाळाविरोधी कारवाईतून विरोधी पक्ष पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्ट नेते एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला हमी देतो की, मी त्यांच्यापैकी कुणालाही सोडणार नाही,' अशी टीकी मोदींनी केली.
#WATCH | PM Narendra Modi speaks on the Uniform Civil Code (UCC)
— ANI (@ANI) June 27, 2023
"Today people are being instigated in the name of UCC. How can the country run on two (laws)? The Constitution also talks of equal rights...Supreme Court has also asked to implement UCC. These (Opposition) people… pic.twitter.com/UwOxuSyGvD
'भाजपची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आहेत. आज या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानतो, याद्वारे मी भाजपच्या सुमारे 10 लाख बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करू शकलो. इतिहासात राजकीय पक्षाचा असा एकही कार्यक्रम आजवर झालेला नाही. तुम्ही केवळ भाजपचेच नाही, तर देशाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मजबूत सैनिकही आहात,' असंही मोदी म्हणाले.
समान नागरी कायदा म्हणजे काय?
समान नागरी कायदा देशातील सर्व नागरिकांसाठी समान कायदे सांगतो. म्हणजेच विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणे, मालमत्तेचे विभाजन यासारख्या बाबींमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नियम आहेत. सध्या देशात विविध धर्मांबाबत वेगवेगळे कायदे आहेत, त्यामुळे देशात समान नागरी कायदा आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.