पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आले समोरासमोर; पण बोललेच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 06:00 AM2018-12-14T06:00:30+5:302018-12-14T06:01:17+5:30
विधानसभा निवडणुकांच्या दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालांत तीन राज्यांत काँग्रेसने भाजपाला पराभूत केल्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव कायम असल्याचे गुरुवारी दिसून आले
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांच्या दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालांत तीन राज्यांत काँग्रेसने भाजपाला पराभूत केल्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव कायम असल्याचे गुरुवारी दिसून आले. संसदेवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्याकरिता संसदेत गुरुवारी पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष गांधी एकत्र आले होते. मात्र, त्यांनी परस्परांशी संभाषणही केले नाही.
मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री विजय गोयल, समाजकल्याणमंत्री रामदास आठवले या दोघांनी राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन केले.
संसद हल्ल्याच्या आठवणी
लष्कर-ए-तय्यबाच्या पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला चढविला होता. त्यात दिल्लीतील पाच पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक महिला कॉन्स्टेबल शहीद झाले होते. संसदेतील एक माळी व एक छायाचित्रकार या हल्ल्यात ठार झाले होते. चार दहशतवादी सुरक्षा दलांच्या गोळीबारात मारले गेले.