विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपाला मिळणार 'इतक्या' जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 12:42 PM2018-05-24T12:42:37+5:302018-05-24T12:44:00+5:30
उत्तर प्रदेशात भाजपाला सर्वाधिक फटका बसेल असं आकडेवारी सांगते
नवी दिल्ली: कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभात विरोधी पक्षांमधील मोठे नेते एकाच व्यासपीठावर दिसले. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी आपली एकजूट दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या उत्तर प्रदेशातील फूलपूर आणि गोरखपूरमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज एकत्र आले होते. त्यावेळी भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळेच देशभरात विरोधक एकत्र आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ते किती मोठं आव्हान ठरेल, याची चर्चा सध्या जोरात सुरू झाली आहे.
2014 मध्ये भाजपानं ज्या 282 मतदारसंघांमध्ये विजय मिळवला, त्या मतदारसंघांमध्ये विरोधक एकत्र आले, तर नेमकं काय चित्र दिसेल, याची आकडेवारी अतिशय रंजक आहे. कर्नाटकमध्ये मोदींविरोधात जे पक्ष एकत्र आले, त्यांची एकजूट पुढील वर्षापर्यंत कायम राहिल्यास भाजपाच्या एकूण 56 जागा कमी होतील. त्यामुळे भाजपाच्या जागा 226 वर येतील. मात्र तरीही भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरेल. विरोधक एकत्र आल्यास भाजपाला सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशात बसेल. गेल्या लोकसभा निवडणुकीत याठिकाणी भाजपाला 71 जागा मिळाल्या होत्या. मात्र उत्तर प्रदेशात काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्यास भाजपाच्या जागा 46 वर येतील.
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन समाज पक्ष एकत्र येऊनही त्याचा परिणाम भाजपाच्या आकडेवारीवर होणार नाही. 2014 मध्ये भाजपानं महाराष्ट्रात 23 मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. विरोधक एकत्र लढल्यास भाजपाची एकही जागा कमी होणार नाही. ही संपूर्ण आकडेवारी भाजपा आणि विरोधकांना 2014 मध्ये मिळालेल्या मतांवर अवलंबून आहे. मात्र 2014 मध्ये काँग्रेसच्या कारभाराला कंटाळून मतदारांनी मतदार केलं होतं. त्यावेळी मोदींनी स्वत:ला सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर ठेवलं होतं. मात्र आता मोदींच्या 5 वर्षांच्या कारभाराचं मूल्यमापन करुन जनता मतदान करेल. त्याचा मोठा परिणाम आकडेवारीवर दिसू शकतो.