"तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक मोठं काम...!" 'काँग्रेस के शहजादे' म्हणत PM मोदीचा राहुल गांधींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 04:42 PM2024-04-02T16:42:43+5:302024-04-02T16:44:29+5:30
पुढच्या टर्ममध्ये भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 'काँग्रेस के शहजादे' म्हणत राहुल गांधींवरही हल्ला चढवला.
आपण भारताला जगातील तिसरी मोठी आर्थव्यवस्था बनवण्याची गॅरंटी दिली आहे. आता तिसऱ्या टर्ममध्ये आपला हा मुलगला आणखी एक मोठं काम करणार आहे. आपल्याला 24 तास वीज मिळावी, वीज बील शून्य व्हावे आणि वीजेपासून आपली कमाईही व्हावी, असे माझे लक्ष्य आहे. तसेच, पुढच्या टर्ममध्ये भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 'काँग्रेस के शहजादे' म्हणत राहुल गांधींवरही हल्ला चढवला. ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे एका रॅलीला संबोधित कत होते.
300 युनिट वीज मोफत... -
मोदी म्हणाले, आपण पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. यामध्ये छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार मदत करत आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाला 300 युनिट वीज लागते. ही वीज मोफत मिळेल, अधिक वीज तयार झाल्यास, सरकार विकत घेईल आणि तुमची कमाईही होईल. यानंतर पंतप्रधान थोडे थांबले आणि त्यांनी जनतेला विचारले, आपण झीरो बिल योजनेचा लाभ घेणार का? त्यासाठी अॅप्लीकेशन करा काम सुरू आहे.
'काँग्रेस के शहजादे' म्हणत राहुल गांधींवर हल्लाबोल -
पंतप्रधान म्हणाले, काँग्रेसच्या राजघराण्यातील 'शहजाद्याने' घोषणा केली आहे, जर देशात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार निवडून आले तर तर आग लागेल. 60 वर्षे देशावर राज्य करणारे 10 वर्षे सत्ते बाहेर काय राहिले, आता देशात आग लगवण्याची भाषा करत आहेत. खरे तर, काही दिवसांपूरवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या विरोधकांच्या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, 'नरेंद्र मोदी या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. 400 ची घोषणा आहे, मॅच फिक्सिंग केल्याशिवाय, हे 180 पारही जाऊ शकत नाहीत. जर भारतात भाजपने मॅच फिक्सिंगची निवडणूक जिंकली आणि त्यानंतर त्यांनी संविधान बदलले, तर या संपूर्ण देशात आग लागेल. मी जे म्हटले आहे, ते लक्षात असू द्या.'
भारताला अस्थिरतेकडे घेऊन जाण्याची काँग्रेसची इच्छा -
आज रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले, त्यांना निवडून-निवडून साफ करा. यावेळी त्यांना मैदानात थांबू देऊ नका. आणीबाणीची मानसिकता असलेल्या काँग्रेसचा आता लोकशाहीवर विश्वास राहिलेला नाही. यामुळे आता ते जनादेशाविरोधात लोकांना भडकावण्याच्या कामात लागले आहेत. भारताला अस्थिरतेकडे घेऊन जाण्याची काँग्रेसची इच्छा आहे. कर्नाटकातील एका मोठ्या काँग्रेस नेत्याने देशाचे तुकडे करण्याची भाषा केली. त्याला शिक्षा देण्याऐवजी काँग्रेसने निवडणुकीचे तिकीट दिले, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.
यावेळी मोदींनी दिवंगत बिपीन रावत यांचाही उल्लेख केला. काँग्रेसने दिवंगत बिपीन रावत यांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. एवढेच नाही तर, काँग्रेस घुसखोरांना प्रोत्साहन देते आणि जेव्हा भाजप सीएएच्या माध्यमाने नागरिकत्व देते, तेव्हा काँग्रेस विरोध करते, असेही मोदी म्हणाले.