"आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है...", निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 06:28 PM2024-07-02T18:28:08+5:302024-07-02T18:28:54+5:30
"आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहे आणि काँग्रेसचे लोक, त्यांचे इकोसिस्टिम हे मनोरंजन करत आहे," अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी कांग्रेस आणि विरोधकांवर थेट निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर झालेल्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. "आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहे आणि काँग्रेसचे लोक, त्यांचे इकोसिस्टिम हे मनोरंजन करत आहे," अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी कांग्रेस आणि विरोधकांवर थेट निशाणा साधला.
मोदी म्हणाले, "काँग्रेसला सलग तीनवेळा शंभरचा टप्पा पार करता आला नाही, अशी काँग्रेसच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. काँग्रेसच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा पराभव आहे. तिसरी सर्वात वाईट कामगिरी आहे. काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला असता, जनतेने दिलेला आदेश मान्य केला असता, आत्मपरीक्षण केले असते, तर बरे झाले असते. मात्र ते शिरशासन करण्यात व्यस्त आहेत. हे दिवस-रात्र, जनतेने आमचा पराभव केला, असे नागरिकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आजकाल बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहे आणि काँग्रेसचे लोक आणि त्यांची इकोसिस्टिम हे मनोरंजनाचे काम करत आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी 60 वर्षांनंतर सलग एखादे सरकार आल्यासंदर्भात भाष्य करताना म्हणाले, लोकसभा निवडणुकीबरोबरच, चार राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. या चारहीराज्यांत आम्हाला अभूतपूर्व यश मिळाले. महाप्रभू जगन्नाथजी यांची भूमी असलेल्या ओडिशाने आम्हाला आशीर्वाद दिला. आंध्र प्रदेशात क्लीन स्वीप केले आहे. सूक्ष्मदर्शक यंत्रातही कुठे हे (विरोधी पक्ष) कुठे दिसत नाहीत. अरुणाचलमध्येही पुन्हा एकदा सरकार आले आहे. सिक्किममध्येही एनडीएचे सरकार आले आहे. राजस्थानातही आम्ही विजयी झालो आहोत. केरळमध्ये यावेळी खाते उघडले आहे. तामिळनाडूमध्येही भाजपने दमदार प्रदर्शन केले आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात गेल्या वेळच्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढली आहे.
आगामी काळात तीन राज्यांमध्ये निवडणुका आहेत. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड. गेल्या विधानसभा निवडणुकीत या तीन राज्यांमध्ये आम्हाला जेवढी मते मिळाली होती, या निवडणुकीत त्याहूनही अधिक मते मिळाली आहेत. पंजाबातही आम्हाला चांगले समर्थन मिळाले आहे. जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. या देशातील जनतेने काँग्रेसलाही जनादेश दिला आहे. हा जनादेश म्हणजे, तेथेच बसा. विरोधातच बसा आणि तर्क संपले की आरडा-ओरड करत राहा.