दूध आणि मर्सिडीजला एकच कर लावू शकत नाही; जीएसटीवरील टीकेला मोदींचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 04:13 PM2018-07-01T16:13:17+5:302018-07-01T16:15:05+5:30
जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत मोदींची काँग्रेसवर टीका
नवी दिल्ली : जीएसटीची वर्षपूर्ती हे सहकारी संघवादाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. अनेक देशांमध्ये एकाच दरानं जीएसटी आकारला जातो. मग मोदी सरकारनं 6 टप्प्यांमध्ये जीएसटी का लागू केला?, असा सवाल विरोधकांनी अनेकदा उपस्थित केला आहे. या टीकेली मोदींनी उत्तर दिलं. 'एकाच टप्प्यात जीएसटी लागू करावा, हे बोलणं सोपं आहे. पण मग आपण कोणत्याही खाद्यपदार्थावर शून्य जीएसटी लागू करु शकत नाही. दूध आणि मर्सिडीजवर समान कर लागू करु शकतो का?' असा प्रश्न मोदींनी स्वराज्य या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला.
जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. 'जीएसटीचा दर एकच असावा, असं आमचे काँग्रेसमधले मित्र म्हणतात. खाद्यपदार्थ आणि वस्तूंवर समान कर असावा, असंही ते सांगतील का? सध्या ज्या खाद्यपदार्थांवर शून्य, 5 किंवा 18 टक्के इतका कर लागतो, त्यांच्यावर वस्तूंइतका कर लावावा, असं काँग्रेसमधील माझे मित्र म्हणतील का?,' असे सवाल उपस्थित करत मोदींनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.
जीएसटीमुळे झालेल्या फायद्यांची आकडेवारीही यावेळी मोदींनी सांगितली. 'जीएसटीमुळे देशाला झालेला आर्थिक लाभ मी आकडेवारीच्या मदतीनं सांगू इच्छितो. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 66 लाख कार्यालयांची नोंदणी झाली होती. मात्र जीएसटी लागू होताच वर्षभराच्या कालावधीतच 48 लाख नव्या कार्यालयांची नोंद झाली. या काळात 350 कोटी इनव्हॉईसवर प्रक्रिया झाली. याशिवाय 11 कोटी लोकांनी कर भरला. जीएसटी अतिशय गुंतागुंतीचा आहे, अशी टीका करण्याआधी ही आकडेवारी आपण लक्षात घ्यायला नको का?,' असा प्रश्न यावेळी मोदींनी उपस्थित केला.