Adhir Ranjan Chowdhury : "जास्त दिवस टिकणार नाही मोदी सरकार, राहुल गांधींना..."; अधीर रंजन यांची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 10:33 AM2024-06-09T10:33:49+5:302024-06-09T10:44:11+5:30
Adhir Ranjan Chowdhury And Modi Government : अधीर रंजन चौधरी यांनी एक नवीन भविष्यवाणी केली आहे. 9 जून रोजी स्थापन होणारं एनडीएचं सरकार फार काळ टिकणार नाही, असं म्हटलं आहे.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी एक नवीन भविष्यवाणी केली आहे. 9 जून रोजी स्थापन होणारं एनडीएचं सरकार फार काळ टिकणार नाही, असं म्हटलं आहे. काँग्रेसच्या निवडणुकीतील कामगिरीनंतर राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते करावं, अशी पक्षातील सर्व सदस्यांची इच्छा आहे. राहुल गांधींनी एलओपी व्हावं अशी सर्व सदस्यांची इच्छा आहे असं CWC बैठकीनंतर अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, काँग्रेस कार्यकारिणीने पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, असा ठराव मंजूर केला. राहुल यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. प्रस्तावात निवडणूक प्रचाराबाबत बोलताना राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलं.
राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवावं - काँग्रेस
सोनिया गांधी, काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, मनीष तिवारी, डीके शिवकुमार आणि रेवंत रेड्डी यांच्यासह नेते या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी म्हणाले की, राहुल हे निर्भय आणि धाडसी आहेत, त्यामुळेच त्यांनी विरोधी पक्षनेते बनले पाहिजे.
"पंतप्रधानांना उत्तर देणारा चेहरा देशाला हवा"
केवळ अधीर रंजन चौधरी आणि प्रमोद तिवारीच नाही तर हरियाणाच्या काँग्रेसच्या खासदार कुमारी सेलजा, केसी वेणुगोपाल, गुरदासपूरमधून लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेस खासदार सुखजिंदर सिंग रंधावा यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांचं मत आहे की राहुल यांना विरोधी पक्षनेते बनवायला हवं. आम्ही संसदेत भक्कम विरोधी पक्षाची भूमिका बजावू. पंतप्रधानांना उत्तर देणारा चेहरा देशाला हवा असं सर्वांचं म्हणणं आहे.