मंदिरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले, माझी चूक काय?, राहुल गांधींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 11:19 AM2024-01-22T11:19:24+5:302024-01-22T11:23:35+5:30
येथील मंदिरात राहुल गांधींना जाऊ दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
- अयोध्येत आज प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक परंपरेसह साजरा होत आहे. त्यासाठी, लाखो भाविक अयोध्या नगरीत जमले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते ही प्राणप्रतिष्ठा होत आहे. देशभरात मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण आहे. अयोध्येत सर्वसामान्य नागरिकांसह नेते, सेलिब्रिटी आणि दिग्गजांची उपस्थिती आहे. दुसरीकडे काँग्रेसने या सोहळ्याला येणार नसल्याचे म्हटले आहे. तर, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. यावेळी, आसाममधील नगाव जिल्ह्यात त्यांची यात्रा पोहोचली आहे. मात्र, येथील मंदिरात राहुल गांधींना जाऊ दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नगाव जिल्ह्यात आसामचे वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे, राहुल गांधी आज वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थळ असलेल्या बर्दोवा येथे जाणार होते. राहुल गांधींना येथील मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. मी येथेच आहे, फक्त हात जोडण्यासाठी मंदिरात जात आहे. मात्र, प्रशासनाने मला मंदिरात जाण्यापासून रोखले, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
मंदिरात जात असलेल्या राहुल गांधींची पोलीस प्रशासनासोबत शाब्दीक वादावादी झाली. त्यानंतर, आज फक्त एकाच माणसाला मंदिरात जाण्याची परवानगी आहे, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. दुपारी ३ नंतर तुम्ही मंदिरात जाऊ शकता, असे पोलीस प्रशासनाने राहुल गांधींना सांगितले आहे.
श्री श्री शंकरदेव जी ने असम की सोच को सबसे अच्छी तरह से सबके सामने रखा है।
— Congress (@INCIndia) January 22, 2024
वे हमारे गुरु हैं, हम भी उनके रास्ते पर चलते हैं। मैं जब यहां आया था, तब मैंने यहां मत्था टेकने का सोचा था।
11 तारीख को हमें आमंत्रण आया था, मगर फिर हमें कहा गया कि सब लोग जा सकते हैं, लेकिन राहुल गांधी… pic.twitter.com/hgqlWTXEjW
राहुल गांधींना बर्दोवा पोलीस ठाण्याकडून मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे, मला मंदिरात का जाऊ दिलं जात नाही, माझी काय चूक आहे?, असा प्रश्न राहुल गांधींनी प्रशासनला केला. तसेच, पोलिसांनी ज्याजागी बॅरिकेड्स लावले, तेथेच त्यांनी ठिय्या मांडल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान, स्थानिक खासदार आणि आमदारांना शंकरदेव मठात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून अडवल्यामुळे काँग्रेस समर्थकांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली.