मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही घडले सत्तांतराचे नाट्य, कमलनाथांप्रमाणेच ठाकरेंनाही गमवावी लागली सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 01:40 PM2022-07-01T13:40:57+5:302022-07-01T13:45:00+5:30
उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच काॅंग्रेसचे नेते कमलनाथ यांनाही २०२०मध्ये अविश्वास प्रस्ताव विधानसभेत मांडण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हाेता. मध्य प्रदेशात भाजप आणि काॅंग्रेसमधील राजकीय द्वंदव बरेच दिवस सुरू हाेते.
अभिलाष खांडेकर -
भाेपाळ : शिवसेनेमधील दीर्घकालीन अंतर्गत संघर्षातून अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. या सर्व घडामाेडीतून शेजारच्या मध्य प्रदेशात घडलेल्या राजकीय नाट्याचे स्मरण झाले.
उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच काॅंग्रेसचे नेते कमलनाथ यांनाही २०२०मध्ये अविश्वास प्रस्ताव विधानसभेत मांडण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हाेता. मध्य प्रदेशात भाजप आणि काॅंग्रेसमधील राजकीय द्वंदव बरेच दिवस सुरू हाेते. सत्ताधारी शिवसेनेप्रमाणेच काॅंग्रेसच्या आमदारांनीही भाजपच्या साेबत जाण्याचा मार्ग निवडला हाेता.
काॅंग्रेसचे २४ आमदार सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याचे कारण सांगून बंगळुरूला निघून गेले. शिवसेनेचेही आमदार अशाच पद्धतीने सर्वप्रथम सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. दाेन्ही राज्यांमध्ये ‘शिंदे’ हेच केंद्रबिंदू हाेते. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी, तर मध्य प्रदेशात ज्याेतिरादित्य सिंधिया यांनी बंडखाेरांचे नेतृत्त्व केले हाेते. विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल, सर्वाेच्च न्यायालय तसेच सत्ताधाऱ्यांकडील असंतुष्टांपर्यंत सर्वांची भूमिका एकसारखी राहिली आणि मार्च २०२०मध्ये कमलनाथ यांचे सरकार पडले. त्यानंतर शिवराजसिंह चौहान यांची सत्ता आली.
या सर्व घडामाेडींमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे, उद्धव ठाकरे असाेत किंवा कमलनाथ, काेणालाच बंडाची कल्पना आली नाही. या बंडाला भाजपने ‘ऑपरेशन लाेटस’द्वारे हवा दिली आणि अनेक वर्षांनी मिळविलेली सत्ता त्यांना गमवावी लागली.
केवळ ही गाेष्ट बदलली
दाेन्ही राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात केवळ एक फरक राहिला, ताे म्हणजे मध्य प्रदेशात शिवराजसिंह चाैहान हे मुख्यमंत्री म्हणून परतले. तर भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची वारी मात्र हुकली.