PK यांचा काँग्रेस प्रवेश पुन्हा टळला; आता अशी आहे सोनिया आणि राहुल गांधी यांची नवी रणनीती!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 10:39 AM2021-10-10T10:39:53+5:302021-10-10T10:41:02+5:30
गेल्या काही महिन्यांत, पीके यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या शक्यतेने काँग्रेसमध्येच अस्वस्थता दिसून येत आहे. राहुल गांधी यांनी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाच्या शक्यतेसंदर्भात माहिती दिली आहे.
नवी दिल्ली - प्रशांत किशोर (Prashant kishor) यांचा काँग्रेस प्रवेश तुर्तास टलळा आहे. इंडिया टुडेसाठी लिहिलेल्या एक रिपोर्टमध्ये '24 अकबर रोड अँड सोनिया: ए बायोग्राफी'चे लेखक रशीद किदवई यांनी म्हटले आहे, की प्रशांत किशोर यांच्या संदर्भात गांधी कुटुंब (सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी) यांनी पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर येथील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) झाल्यानंतर काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेशासंदर्भात चर्चा करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.
महत्वाचे म्हणजे, कॉंग्रेसमधील बहुचर्चित औपचारिक प्रवेश टाळण्याचा पीके यांचा आग्रह नव्हता. बोलले जाते, की या प्रवेशाकडे पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरच्या निकालांशी जोडून पाहिले जाऊ नये, असे, सोनिया आणि प्रियांका गांधी यांचे मत होते.
किदवई यांनी त्यांच्या लेखात लिहिले आहे, की पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंह चन्नी यांच्या निवडीमध्ये पीके यांची कसल्याही प्रकारची भूमिका नाही. ही आयडिया काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगे यांची होती आणि राहुल गांधी यांनी ती स्वीकारली. काँग्रेस आणि पीके यांचा राजकीय विचार, केवळ 2024 च्या लोकसभा निवडणुकांपुरताच मर्यादित असल्याचे जाणकार सूत्रांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांची चर्चा केवळ काँग्रेसमधील सुधारणा, संघटनात्मक बदल, तिकीट वितरण प्रणालीचे संस्थात्मकीकरण, निवडणूक आघाडी आणि देणग्यांवर केंद्रित आहे.
गेल्या काही महिन्यांत, पीके यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या शक्यतेने काँग्रेसमध्येच अस्वस्थता दिसून येत आहे. राहुल गांधी यांनी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाच्या शक्यतेसंदर्भात माहिती दिली आहे. एके अँटनी, मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी यांच्यापासून ते अनेक माध्यम आणि युवा नेत्यांपर्यंत किशोर यांच्या संभाव्य प्रवेशाचे स्वागत झाले आहे. मात्र, काही मंडळींनी दबक्या आवाजात सुचवले आहे, की पक्षाने आपल्या राजकीय कामांसंदर्भात नव्याने प्रवेशा करणाऱ्यांसाठी आउटसोर्सिंग म्हणून पाहू नये.