नरेंद्र मोदींना सत्तेत आणणारा 'चाणक्य' धरणार काँग्रेसचा हात? वेगवान हालचालींना सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:00 PM2021-07-29T15:00:05+5:302021-07-29T15:02:49+5:30
२०१४ मध्ये नरेंद्र मोदींसाठी काम करणारा चाणक्य काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा
नवी दिल्ली: गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची धूळधाण उडाली. सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला. सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असून त्यामुळे पक्ष अधिकच गलितगात्र झाला आहे. २०१४ पासून अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. या परिस्थितीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्रानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी नवी दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली. किशोर यांनी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाचं वृत्त फेटाळून लावलं आहे. मात्र किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात असं वृत्त हिंदुस्थान टाईम्सनं दिलं आहे. यासंदर्भात राहुल गांधी पक्षातील नेत्यांची मतं जाणून घेत आहेत.
२२ जुलैला राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. ए. के. अँटनी, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, कमलनाथ आणि अंबिका सोनी बैठकीला हजर होते. त्यानंतर किशोर यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल वेगवान हालचाली सुरू झाल्या.
प्रशांत किशोर यांना पक्ष प्रवेश देण्याबद्दल सहमती असल्यास त्यांना महासचिव (अभियान व्यवस्थापन) पदासह महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाऊ शकते. किशोर यांनी १५ जुलैला गांधी कुटुंबाची भेट घेतली. यामध्ये काँग्रेसला चालना देण्यासंदर्भात त्यांनी एक प्रेझेंटेशन सादर केल्याची माहिती वृत्तात आहे. यानंतर राहुल यांनी २२ जुलैला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. किशोर यांच्याबद्दल पक्षातील वरिष्ठ नेत्यांना काय वाटतं, ते जाणून घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.