Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारचं केलं कौतुक; राहुल गांधींवर साधला जोरदार निशाणा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 04:50 PM2024-08-25T16:50:56+5:302024-08-25T17:00:58+5:30
Prashant Kishor And Narendra Modi : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जातनिहाय जनगणनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
पाटणा येथे आयोजित जन सुराज महिला संवादात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जातनिहाय जनगणनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून बिहारच्या नेत्यांचीही खरडपट्टी काढली. जातनिहाय जनगणनेमुळे बिहारमधील गरिबी दूर झाली का? असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधींनी काँग्रेस शासित राज्यात जातनिहाय जनगणना करावी असंही म्हटलं आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देत केंद्रातील मोदी सरकारने शनिवारी युनिफाइड पेन्शन स्कीमला मंजुरी दिली. प्रशांत किशोर यांनी केंद्र सरकारच्या या पावलाचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले की, "केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस स्कीम आणली आहे, ज्यामध्ये २३ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. केंद्राने ओपीएस आणि एनपीएसमध्ये मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे"
"तेजस्वी यादव विकासावर बोलतात तेव्हा ते हास्यास्पद वाटतं"
प्रशांत किशोर म्हणाले की, आरजेडी नेते तेजस्वी यादव जेव्हा विकासावर बोलतात तेव्हा ते हास्यास्पद वाटतं. तेजस्वी यादव सहा महिन्यांपूर्वीपर्यंत नितीश कुमार यांच्यासोबत होते. नितीश कुमार यांनी कर्मचाऱ्यांचे अधिकार हिरावून घेतले आहेत. जन सुरज २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहेत, ज्यामध्ये ४० टक्के महिला उमेदवार असतील. बिहारमध्ये महिलांची स्थिती अत्यंत वाईट आहे. आता बिहारमध्ये लालू यादव, नरेंद्र मोदी यांची सत्ता नाही. नितीश कुमारांची नव्हे तर जनतेची सत्ता हवी."
महिलांना आव्हान केलं की मुलांना शिक्षण द्या.
"ज्या नेत्यांनी बिहारला लुटलं, ज्यांनी येथील जनतेला कंगाल केलं आणि मुलांचे भविष्य उद्ध्वस्त केलं, अशा नेत्यांना मतदान करू नये. त्यांनी तेथे उपस्थित महिलांना आव्हान केलं की मुलांना शिक्षण द्या. तुमची मुलं जोपर्यंत शिकत नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणीही डॉक्टर आणि इंजिनिअर बनवू शकत नाही" असंही त्यांनी म्हटलं आहे.