UP Election 2022: “राहुल गांधी हे प्रियंका गांधींना यूपीत काँग्रेसचा चेहरा बनवू इच्छित नव्हते”: प्रशांत किशोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 02:06 PM2021-10-14T14:06:11+5:302021-10-14T14:07:30+5:30
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) तयारीने आणखी थोडा वेग घेतला आहे.
लखनऊ: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) तयारीने आणखी थोडा वेग घेतला असून, राजकारण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे परिस्थिती कठीण होत चालल्याची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. यातच राजकारणातील चाणक्य मानले जाणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) आता काँग्रेससोबत आगामी निवडणुकीसाठी रणनीती तयार करायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे लखीमपूर घटनेनंतर आता प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) उत्तर प्रदेशच्या राजकारण अधिक सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच सन २०१७ रोजी झालेल्या निवडणुकांवेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक काँग्रेस नेते प्रियंका गांधी यांना काँग्रेसचा चेहरा बनवण्यास तयार नव्हते, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसच्या ऑफरबाबत सुरुवातीला साशंक होतो. यासाठी माझ्या सहकार्यांकडून सल्लाही घेतला होता. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला, तर त्यातून प्रचंड यश काही नसेल. तीन महिने उत्तर प्रदेशचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर काँग्रेससमोर प्लान सादर केला. मात्र, सुरुवातीला राहुल गांधी काही गोष्टींसाठी तयार नव्हते. काही गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला, अशी आठवण प्रशांत किशोर यांनी सांगितली.
प्रियंका गांधींना काँग्रेसचा चेहरा बनवायचे होते
माझ्या प्लाननुसार प्रियंका गांधी यांना काँग्रेसचा चेहरा बनवायचे होते आणि सोनिया गांधी निवडणूक कॅम्पेन लॉंच करतील, अशी रणनीती होती. तीन महिने यावर खूप चर्चा झाली आणि अखेर माझे म्हणणे त्यांना पटले. सुरुवातीला काँग्रेसने चांगले वातावरण तयार केले होते. मात्र, समाजवादी पक्षासह केलेली आघाडी सर्वाधिक नुकसानकारक ठरली, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी व्हावी, असे मला कधीच वाटले नाही. मात्र, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे पडले की, सपासोबत निवडणुकीत उतरल्यास मोठा फायदा होऊ शकेल. मात्र, म्हणून मी काँग्रेसपासून लांब गेलो किंवा दूर झालो नाही, असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले.