Prashant Kishor congress: काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? प्रशांत किशोर यांनी दोनदा घेतली सोनिया गांधींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 09:47 AM2022-04-19T09:47:20+5:302022-04-19T09:47:26+5:30
Prashant Kishor Met Sonia Gandhi: मागील तीन दिवसात दोनवेळा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या, यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरही उपस्थित होते.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये खलबंत सुरू झाली आहेत. यासंदर्भात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी शनिवारी उच्चस्तरीय बैठक झाली. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हेदेखील या बैठकीत उपस्थित होते. 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत त्यांनी सादरीकरण केले. यानंतर सोमवारीही 10 जनपथ येथे झालेल्या बैठकीला प्रशांत किशोर यांनी हजेरी लावली होती. प्रशांत किशोर यांनी 3 दिवसांत दुसऱ्यांदा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे.
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये येणार?
सोमवारी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची तब्बल 5 तास बैठक झाली. त्यात प्रियांका गांधी, अंबिका सोनी, पी चिदंबरम, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश होता. प्रशांत किशोर हेही बैठकीला उपस्थित होते. प्रशांत किशोर यांना काँग्रेसने पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र पक्ष त्यांचा सल्लागार म्हणून वापर करणार नसून नेता म्हणून काम करण्यास सांगितले आहे.
ठराविक जागांवर लक्ष केंद्रित करावे
प्रशांत किशोर यांनी शनिवारच्या बैठकीत काँग्रेसने लोकसभेच्या 370 जागांवर लक्ष केंद्रित करावे आणि उर्वरित जागांवर आघाडी करावी, असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसने बिहार, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये एकट्याने निवडणूक लढवावी, तर तामिळनाडू, महाराष्ट्र, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये आघाडी केली पाहिजे, असे किशोर यांचे म्हणने आहे.
काय म्हणाले राहुल गांधी
8 एप्रिल रोजी राहुल गांधींनी पहिल्यांदाच 'संयुक्त विरोधी आघाडी'चा इशारा दिला होता. जे आरएसएस आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहेत त्यांनी एकत्र यावे, असे राहुल गांधी म्हणाले होते. पण ते कसे एकत्र येतील यासाठी एक रचना तयार करणे आवश्यक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये काँग्रेसमधील संपर्क विभाग आणि सोशल मीडियासह सध्याची संघटनात्मक रचना बदलण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.