Prashant Kishor यांनी विरोधकांना सांगितला 2024 मध्ये भाजपला चीत करण्याचा फॉर्म्युला, गणितही समजावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 09:44 PM2023-03-29T21:44:25+5:302023-03-29T21:46:19+5:30
"सत्तेत बसलेली व्यक्ती कायमस्वरूपी सत्तेवर नसते. गांधी घराणेही सत्तेत होते. पुढे कोण सत्तेत येईल हे कुणीच सांगू शकत नाही."
पाटणा - बिहारमध्ये जनसुराज यात्रा करत असलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, राहुल गांधींना अपात्र ठरविणे दुर्दैवी आहे. हे लोकशाहीसाठी योग्य नाही. नियम आपल्या जागी आहेत. भाजपचे दिग्गज आदरणीय नेते दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक वाक्य आहे की, 'छोट्या मनाने कोणीही मोठा होत नाही'. न्यायालयाने जो काही निर्णय द्यावयाचा होता तो दिला. पण मला वाटते की सरकारमधील लोकांनी राहुल गांधींना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा होता.
तसेच, उच्च न्यायालयानेही हाच निर्णय दिला असता, तर राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्यावर कुणीही आक्षेप घेतला नसता. एवढेच नव्हे तर, सत्तेत बसलेली व्यक्ती कायमस्वरूपी सत्तेवर नसते. गांधी घराणेही सत्तेत होते. पुढे कोण सत्तेत येईल हे कुणीच सांगू शकत नाही, असेही प्रशांत किशोर म्हणाले. ते एका खासगी वृत्तवाहीनीसोबत बोलत होते.
प्रशांत किशोर यांनी दिला 2024 मध्ये भाजपला चीत करण्याचा फॉर्म्युला -
यावेळी प्रशांत किशोर यांनीही 2024 मध्ये भाजपला हरविण्याचा फॉर्म्युलाही सांगितला. ते म्हणाले, की 2019 च्या निवडणुकीत भाजपला केवळ 38 टक्के मते मिळाली होती. हे सोप्या भाषेत असे समजून घ्या की, 100 लोक मतदानासाठी गेले होते, यांपैकी 62 लोकांनी विरोधी पक्षांना मत दिले. आता बहुमताचा विचार केला तर, 62 लोकांनी भाजपला मत दिले नाही. भाजपला केवळ 38 लोकांनीत मतदान केले. यामुळे, आता गरज आहे, ती या विखुरलेल्या 62 जणांना कोणीतरी एकत्रित करण्याची अर्थात, पक्षांना आणि नेत्यांना एकत्र करण्याची. जगातील प्रत्येक गोष्टीवर तोडगा आहे.