पंतप्रधान, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?; दिल्लीच्या सीमांवरील प्रवेशबंदी पाहून राहुल-प्रियंका गांधींचा सवाल
By जयदीप दाभोळकर | Published: February 2, 2021 12:36 PM2021-02-02T12:36:13+5:302021-02-02T12:39:54+5:30
सीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग, रस्त्यांवर खिळेही ठोकले
गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या निरनिराळ्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीलाही हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या घटनेनंतर सरकारही आंदोलकांचा कठोरपणे सामना करण्याची तयारी करण्याच्या तयारीत दिसत आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांद्वारे अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सीमांवर पोलिसांद्वारे करण्यात येत असलेल्या तयारीची काही छायाचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरू शेअर केली आहे. "भारत सरकार, भिंती उभारू नका, पूल उभारा," असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंना दिलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच पंतप्रधान महोदय, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? असं कॅप्शनही त्यांनी त्याला दिलं आहे.
GOI,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 2, 2021
Build bridges, not walls! pic.twitter.com/C7gXKsUJAi
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येत आहे. अशातच ६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी चक्का जाम करण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली पोलिसांनी गाझीपूर, टिकरी आणि सिंघु सीमेवर या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. तसंच या ठिकाणी सीमांवर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. तसंच सीमेंटचेही मोठी बॅरिकेड्स तयार करण्यात आले आहेत. रस्त्यांवर खिळेही लावण्यात आले आहे. तसंच आंदोलकांचे ट्रॅक्टर पुढे जाऊ नयेत यासाठी तारांचाही वापर करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री जी, अपने किसानों से ही युद्ध? pic.twitter.com/gn2P90danm
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 2, 2021
राऊतांकडूनही टीका
"दिल्लीपेक्षा भारत-चीन सीमेवरील रस्त्यांवर सळ्या लावल्या असत्या, खिळे ठोकले असते, तर चीनी भारतात घुसले नसते, असा चिमटा राऊत यांनी केंद्र सरकारला काढला. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत तिरंग्याचा अपमान झाल्याचा मुद्दा भाजपकडून वारंवार उपस्थित करण्यात येतो. त्यालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. 'आम्ही शेतकऱ्यांची भेट घेणार आहोत. महाविकास आघाडीचं सरकार तुमच्या पाठिशी असल्याचा विश्वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. शेतकरी केवळ स्वत:साठीच नाही, तर आपल्यासाठीही आंदोलन करत आहेत. त्यांच्या लढ्याला बळ देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. हाच तिरंग्याचा सन्मान आहे," असं राऊत म्हणाले.