अमेठी किंवा रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढविण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:25 AM2021-09-15T07:25:22+5:302021-09-15T07:26:34+5:30
प्रसंगी मुख्यमंत्रीपदाच्याही उमेदवार असतील
शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजपशी थेट मुकाबला करण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी अमेठी अथवा रायबरेलीतून निवडणूक लढविण्यावर विचार करत आहेत. त्यांच्या राजकीय सल्लागार समितीच्या एका सदस्याने लोकमतशी बोलताना हे संकेत दिले.
या सल्लागारांनी स्पष्ट केले की, प्रियांका गांधी यांची पहिली पसंत अमेठी आहे. कारण, राहुल गांधी यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी अमेठीत लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायची आहे. जेणेकरून, स्मृती इराणी यांना २०२४ च्या निवडणुकीत आव्हान देता येऊ शकेल. रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही प्रियांका गांधी यांना अमेठी किंवा रायबरेलीतून लढण्याचा सल्ला दिला होता. प्रियांका गांधी यांचा अलीकडचा दौरा, बैठका या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी तर सांगितले आहे की, प्रियांका गांधी काँग्रेसचा चेहरा असतील.
राहुल गांधी म्हणाले...
- विशेष म्हणजे प्रियांका गांधी यांनी सातत्याने योगी यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. राहुल गांधी यांनीही ट्वीट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे की, जे द्वेष करतात, ते योगी कसले, असे त्यांनी म्हटले आहे.
- प्रियांका गांधी यांनी यापूर्वीच योगी यांच्यावर टीका केली आहे की, खोट्या जाहिराती देणे हे यांचे कामच आहे.
- राज्यातील तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले. आता फ्लायओव्हर व कारखान्यांचे खोटे छायाचित्रे लावून विकासाचा खोटा दावा करण्यात येत आहे.