Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:47 PM2024-05-17T12:47:59+5:302024-05-17T12:58:43+5:30
Priyanka Gandhi And Rahul Gandhi : काँग्रेसच्या प्रचारात व्यस्त असलेल्या प्रियंका गांधी यांनी भाऊ राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत मोठं विधान केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात व्यस्त असलेल्या प्रियंका गांधी यांनी भाऊ राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत मोठं विधान केलं आहे. प्रियंका यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, राहुल गांधींनी लग्न करावं, आनंदी राहावं आणि त्यांना मुलं व्हावीत अशी माझी इच्छा आहे. प्रियंका गांधी रायबरेली आणि अमेठीमध्ये सातत्याने निवडणूक सभा घेत आहेत. राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवत असताना काँग्रेसने त्यांचे निकटवर्तीय किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, "एक बहीण या नात्याने मला माझ्या भावाने आनंदी राहावं असं वाटत आहे. मला असं वाटतं त्याने लग्न करावं आणि त्याला मुलं व्हावीत." काँग्रेसच्या नेतृत्त्वातील इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा राहुल गांधी असतील तर तुम्हाला आनंद होईल का असा प्रश्न विचारला असता प्रियंका यांनी जर आम्ही सत्तेत आलो तर याचा निर्णय इंडिया आघाडी घेईल असं म्हटलं आहे.
प्रियंका गांधी यावेळी अमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. प्रदीर्घ काळाच्या सस्पेन्सनंतर काँग्रेसने राहुल गांधींना रायबरेली येथून उमेदवारी दिली, ती सोनिया गांधींची जागा होती. मात्र फेब्रुवारीमध्ये राज्यसभेवर गेल्यानंतर सोनिया गांधी यांनी यापुढे रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. दुसरीकडे, काँग्रेसने अमेठीतून स्मृती इराणींच्या विरोधात गांधी परिवाराचे निष्ठावंत केएल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
रायबरेली मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेत प्रियंका यांनी भाजपा सरकारवर घोषणाबाजी केल्याचा आरोप केला आणि म्हणाल्या, त्यांच्या घोषणांनी 10 वर्षे काम केलं, ते आता चालणार नाहीत. तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल आणि दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. जे काही बोलले गेले ते निवडणुकीनंतर नाकारलं गेलं.