Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 01:36 PM2024-05-03T13:36:54+5:302024-05-03T13:47:16+5:30
Lok Sabha Election 2024 And Jairam Ramesh : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र पक्षाने रणनीती बदलून नवे चेहरे उभे करण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर अमेठीच्या जागेवर पक्षाने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. किशोरीलाल हे सोनिया गांधी यांच्या जवळच्या मानले जातात. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधींनी यापूर्वी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा यापूर्वी होती. मात्र, पक्षाने अचानक रणनीती बदलून दोन्ही जागांवर नवे चेहरे उभे करण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयराम रमेश म्हणाले की, "राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या वृत्तावर अनेकांची मतं आहेत. पण ते राजकारण आणि बुद्धिबळातील अनुभवी खेळाडू आहेत आणि आपली वाटचाल विचारपूर्वक करतात."
"पक्षनेतृत्वाने बरंच विचारमंथन केल्यानंतर आणि मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने भाजपा, त्यांचे समर्थक कोलमडले आहेत. गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्याचा विचार केला तर, केवळ अमेठी-रायबरेलीच नाही तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत संपूर्ण देश गांधी घराण्याचा गड आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशातून तीनदा आणि केरळमधून एकदा खासदार झाले, पण निवडणूक लढवण्याची हिंमत मोदीजी का दाखवू शकले नाहीत? आणखी एक गोष्ट स्पष्ट आहे की, काँग्रेस परिवार हे लाखो कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांचे कुटुंब आहे."
"काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हा मोठ्या नेत्यांपेक्षा जास्त ताकदवान आहे. काल एक प्रख्यात पत्रकार अमेठीतील एका कार्यकर्त्याला उपहासाने विचारत होता की, तिकीट काढण्याची तुमचा नंबर कधी येईल? हे घ्या... आला आहे. एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ता अमेठीत भाजपाचा भ्रम आणि अहंकार दोन्ही तोडेल. प्रियंकाजी जोरदार प्रचार करत आहेत आणि त्या एकट्या नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रत्येक खोट्याला सत्याने उत्तर देऊन गप्प करत आहेत, म्हणूनच त्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहणे आवश्यक होते."
"प्रियंकाजी कोणतीही पोटनिवडणूक लढवून सभागृहात पोहोचतील. आज स्मृती इराणी यांची एकमेव ओळख आहे ती म्हणजे त्या अमेठीतून राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवतात. आता ती प्रसिद्धीही स्मृती इराणींकडून हिरावून घेतली गेली. आता व्यर्थ विधानं करण्यापेक्षा स्मृती इराणींनी स्थानिक विकासाबाबत उत्तर द्यावे, बंद पडलेली रुग्णालये, स्टील प्लांट आणि आयआयआयटी यांच्यावर उत्तर द्यावं. बुद्धिबळातील काही चाली बाकी आहेत, थोडी वाट पाहा" असं देखील जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.