काँग्रेस अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला लवकरच प्रारंभ- सुरजेवाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 03:18 AM2020-12-19T03:18:22+5:302020-12-19T07:02:29+5:30
राहुल गांधीच हवे पक्षाध्यक्षपदी
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असे त्या पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी सांगितले. राहुल गांधी हेच काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून यावेत, अशी आमच्या पक्षातील माझ्यासह ९९.९ टक्के लोकांची इच्छा आहे, असेही सुरजेवाला म्हणाले.
सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची उद्या व्हर्च्युअल बैठक बोलाविली असून त्यात नव्या पक्षाध्यक्षाच्या निवड प्रक्रियेबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले, काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आदी लोक पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सर्वोत्कृष्ट उमेदवारालाच निवडतील.
काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करावेत, अशी जोरदार मागणी त्या पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी केली होती. त्यावरून त्या पक्षात मोठे वादळ निर्माण झाले होते. त्या मागणीनंतर आता काँग्रेसमध्ये बदल घडविण्यासाठी काही हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत.
निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
आगामी काळात काँग्रेसला पुन्हा मजबूत करणारा तसेच निवडणुकांत घवघवीत यश मिळवून देणारा नवा अध्यक्ष मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.