शेतकरी आंदोलनाचा प्रश्न : शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची राहुल गांधी यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 07:55 AM2021-12-04T07:55:08+5:302021-12-04T07:56:36+5:30
Rahul Gandhi : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची नोंद नसल्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवता दाखवूून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची नोंद नसल्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवता दाखवूून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या पाचशेंहून अधिक शेतकऱ्यांची सोमवारी संसदेत यादी सादर करून सरकारकडे भरपाईची मागणी करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या मुद्यावरून सोमवारी संसदेत गदारोळ होण्याचे संकेत मिळतात.
राहुल गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, एका दिवसापूर्वी सरकारने म्हटले होते की, आमच्याकडे शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचा आकडा नसल्याने भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधी यांनी पंजाब सरकारकडून आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचा तपशील मागावला. यात ५०४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ५-५ लाख रुपयांची भरपाई दिली असून १५२ कुटुंबीयांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. इतरांनाही लवकरच नोकरी दिली जाणार आहे.
यादी संसदेत सोमवारी सादर करणार
- राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या ५०४ शेतकऱ्यांची नांवे, पत्ता आणि फोन नंबरसह यादी जारी करून ही यादी सोमवारी संसदेत सादर करून हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले.
- सूत्रांनुसार काँग्रेस सोमवारी संसदेत सरकारवर दबाव आणण्यासाठी अन्य पक्षांशी चर्चा करीत आहे. जेणेकरून सामायिक रणनीतीनुसार सरकारवर दबाव आणता येईल.