Rafale Deal: 'राहुल गांधींनी मोदींविरोधात पाकिस्तानसोबत महाआघाडी केलीय का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 12:52 PM2018-09-23T12:52:03+5:302018-09-23T12:55:22+5:30
भाजपा अध्यक्ष अमित शहांचा राहुल गांधींना सवाल
नवी दिल्ली: राफेल डीलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना भाजपा अध्यक्ष अमित शहांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसनं मोदींविरोधात पाकिस्तानसोबत महाआघाडी केली आहे का?, असा प्रश्न अमित शहांनी उपस्थित केला आहे. राफेल विमान खरेदीवरुन फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राहुल यांनी मोदींवर कठोर शब्दांमध्ये टीका केली होती.
राफेल डीलसाठी मोदी सरकारनं केवळ अनिल अंबानी यांच्या कंपनीचं नाव सुचवलं होतं, असा दावा फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केला. यावरुन राहुल यांनी मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. राहुल यांचं मोदींवर टीका करणारं ट्विट पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसेन यांनी रिट्विट केलं. याचा संदर्भ देत अमित शहांनी राहुल गांधींवर तोंडसुख घेतलं. 'राहुल गांधी म्हणतात मोदी हटाव. पाकिस्तानही म्हणतं मोदी हटाव. आता पाकिस्ताननंदेखील राहुल गांधींच्या सूरात सूर मिसळायला सुरुवात केली आहे. काँग्रेसनं मोदींविरोधात आंतरराष्ट्रीय महाआघाडी केली आहे का?', असा सवाल अमित शहांनी विचारला आहे.
Rahul Gandhi says ‘Modi Hatao’
— Amit Shah (@AmitShah) September 22, 2018
Pakistan says ‘Modi Hatao’
Now Pakistan also supports Rahul Gandhi’s baseless allegations against PM Modi.
Is Congress forming an International Mahagathbandhan against PM Modi?#NaPakNaCongresshttps://t.co/eHBs0DGfBP
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डीलवरुन मोदींना अनेकदा लक्ष्य केलं आहे. आता फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. मोदी सरकारकडून राफेल करारासाठी अनिल अंबानींच्या रिलायन्सचं नाव सुचवण्यात आलं होतं. मोदी सरकारनं केवळ एकच नाव सुचवल्यानं फ्रान्सच्या डॅसो एव्हिऐशन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असं विधान फ्रान्सवा ओलांद यांनी केलं होतं. यावरुन राहुल गांधींनी मोदींवर जोरदार टीका केली होती. फ्रान्सचे माजी अध्यक्ष मोदींना चोर म्हणाले. आता तरी मोदींनी मौन सोडावं, अशा तिखट शब्दांमध्ये राहुल यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदी आणि अनिल अंबानींनी भारतीय सुरक्षा दलांवर 1 लाख 30 हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा घणाघातही राहुल यांनी केला होता.