पंतप्रधान मोदींकडून भारतीय सुरक्षा दलांवर 1 लाख 30 हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 01:52 PM2018-09-22T13:52:22+5:302018-09-22T13:54:35+5:30
राफेल डीलवरुन राहुल गांधींची मोदींवर जोरदार टीका
नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आणि आणि रिलायन्सच्या अनिल अंबानी यांच्यात नेमकं काय डील झालं, हे देशाला कळायला हवं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. मोदींनी भारतीय सुरक्षा दलांवर 1 लाख 30 हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी मोदींवर बरसले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी मिळून भारतीय सुरक्षा दलांवर 1 लाख 30 हजार कोटी रुपयांचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. 'मोदीजी तुम्ही देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या रक्ताचा अपमान केला आहे. तुम्हाला लाज वाटायला हवी,' अशा तिखट शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. राफेल व्यवहाराच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
The PM and Anil Ambani jointly carried out a One Hundred & Thirty Thousand Crore, SURGICAL STRIKE on the Indian Defence forces. Modi Ji you dishonoured the blood of our martyred soldiers. Shame on you. You betrayed India's soul. #Rafale
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 22, 2018
राफेल डीलसाठी मोदी सरकारनं फक्त अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचं नाव सुचवलं होतं. त्यामुळेच फ्रान्सच्या डॅसो एव्हिएशेन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असं विधान फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली. यानंतर राहुल गांधींनी मोदींवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. मोदींनी वैयक्तिक रस घेऊन राफेल डीलमध्ये बदल केले, असा आरोप राहुल गांधींनी ओलांद यांच्या विधानानंतर केला. राहुल गांधींनी ओलांद यांचे आभार मानत मोदींवर निशाणा साधला. 'दिवाळखोर झालेल्या अनिल अंबानींसाठी मोदींनी कोट्यवधी रुपयांचा करार केला. त्यांनी देशाचा विश्वासघात केला. त्यांनी आपल्या देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांचा अपमान केला,' अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले.