Rafale Deal: आम्ही रिलायन्समध्ये गुंतवणूक केलेली नाही; राहुल गांधींच्या आरोपांवर दसॉल्टचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:25 PM2018-11-13T12:25:47+5:302018-11-13T12:30:23+5:30
राहुल गांधींच्या आरोपांना दसॉल्टचं उत्तर
मार्सेल, फ्रान्स: विमान निर्मितीचा कोणताही अनुभव नसताना, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादामुळे रिलायन्सला राफेल विमानाचं कंत्राट मिळालं, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनेकदा केला आहे. या आरोपाला राफेलची निर्मिती करणाऱ्या दसॉल्ट कंपनीच्या सीईओंनी उत्तर दिलं आहे. आम्ही अनिल अंबानींच्या कंपनीत नव्हे, तर जॉईंट व्हेंचरमध्ये गुंतवणूक केली आहे, असं स्पष्टीकरण दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी दिलं आहे.
अनिल अंबानींची पंतप्रधान मोदींशी जवळीक असल्यानं त्यांच्या कंपनीला विमान निर्मितीचं कंत्राट देण्यात आलं, असा गंभीर आरोप राहुल यांनी वारंवार केला आहे. राफेल डीलसाठी रिलायन्सची निवड करण्यासाठी मोदी सरकारनं दसॉल्ट कंपनीवर दबाव आणला, असाही आरोप त्यांनी केला होता. यावर एरिक ट्रॅपियर यांनी भाष्य केलं. आम्ही स्वत:हून रिलायन्स कंपनीची निवड केली, असं ते म्हणाले. याशिवाय दसॉल्ट कंपनीनं रिलायन्समध्ये कोणतीही गुंतवणूक केली नसल्याचंदेखील त्यांनी स्पष्ट केलं. 'आम्ही रिलायन्स कंपनीत कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. दसॉल्ट रिलायन्ससोबत राफेलची निर्मिती करणार आहे. हा प्रकल्प दोन्ही कंपन्या मिळून पूर्ण करतील. जॉईंट व्हेन्चरच्या माध्यमातून राफेलची निर्मिती केली जाईल. यासाठी रिलायन्सदेखील गुंतवणूक करेल. ही गुंतवणूक जॉईंट व्हेन्चरमध्ये असेल,' अशा शब्दांमध्ये त्यांनी राफेल डील उलगडून सांगितलं. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
विमान निर्मिती क्षेत्रातील शून्य अनुभव असलेल्या रिलायन्सला राफेलचं कंत्राट देणं हवाई दलासाठी धोकादायक आहे, असा आक्षेपदेखील राहुल गांधींनी नोंदवला होता. त्यावरही एरिक यांनी स्पष्टीकरण दिलं. 'आमच्या कंपनीकडे प्रशिक्षित अभियंते आणि कर्मचारी आहेत. दुसरीकडे भारतातील रिलायन्स कंपनी या क्षेत्रात नवी आहे. दसॉल्टसोबतच रिलायन्सदेखथील या प्रकल्पात गुंतवणूक करेल. यामुळे रिलायन्सला विमान निर्मितीचा अनुभव मिळेल,' असं दसॉल्टच्या सीईओंनी स्पष्ट केलं.