Raghuram Rajan: ... म्हणून भारत जोडो यात्रेत सहभागी झालो, रघुराम राजन यांनी मौन सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 03:13 PM2023-01-03T15:13:17+5:302023-01-03T15:15:20+5:30
रघुराम राजन यांनी डिसेंबरमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला.
नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दिल्लीनंतर आता गांधींच्या होम ग्राऊंडमध्ये म्हणजे उत्तर प्रदेशात पोहोचली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी युपीत राहुल गांधींच स्वागत केलं. एकीकडे ही यात्रा युपीत पोहोचली असतानाच दुसरीकडे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारत जोडो यात्रेबद्दल आणि यातील सहभागाबद्दल मोठं विधान केलं आहे. राजन यांनी राजकारणातील प्रवेशाच्या चर्चेंवरही स्पष्टपणे भूमिका मांडली.
रघुराम राजन यांनी डिसेंबरमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला. राजस्थानमध्ये राहुल गांधींची ही यात्रा पोहोचलेली असता राजन काही अंतर या यात्रेमध्ये राहुल गांधींसोबत पायी चालले. राजस्थानमधील सवाई माधवपूर येथील भदोईमधून राहुल गांधींच्या आजच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली होती. त्यावेळी, राजन सहभागी झाले. “भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींबरोबर चालताना आरबीआय़चे माजी गव्हर्नर रघुराम राजन”, अशा कॅप्शनसहीत राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचा फोटो काँग्रेसच्या ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला होता.
“नफरत के खिलाफ देश जोड़ने के लिए खड़े होने वालों की बढ़ती संख्या बताती है कि- हम होंगे कामयाब,” असंही रघुराम राजन यांचा फोटो शेअर करत काँग्रेसने म्हटले होते. आता, रघुराम राजन यांनी भारत जोडो यात्रेतील सहभागाबद्दल भूमिका स्पष्ट केली. राजन हे राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, राजन यांनी राजकारणात येण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आपण राजकारण येणार नाही. 'केवळ एक सजग आणि चिंताग्रस्त' नागरिक म्हणून मी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो, असे राजन यांनी सांगितले. आपल्या लिंक्ड इन सोशल मीडिया हँडलवरुन त्यांनी याबाबत पोस्ट लिहिली आहे.
दरम्यान, नव्या वर्षाचा संकल्प करताना आपण सर्वांनी त्या भारत देशाला सुरक्षित ठेवायला हवं, ज्यावर आपण प्रेम करतो, असेही त्यांनी म्हटलं.