राहुल अध्यायाचा शुभारंभ ! काँग्रेसच्या कामगिरीवर नेते खूश : प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:13 AM2017-12-19T01:13:03+5:302017-12-19T01:13:44+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची चमकदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम असून, हे यश म्हणजे त्यांच्या राजकीय अध्यायाचा शुभारंभ होय, अशा शब्दांत काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची चमकदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम असून, हे यश म्हणजे त्यांच्या राजकीय अध्यायाचा शुभारंभ होय, अशा शब्दांत काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
गुजरात हा भाजपाचा बालेकिल्लाच आहे. तेथे आम्ही एवढ्या जागा केवळ राहुल गांधी यांच्यामुळे मिळवू शकलो. यंदा आमची कामगिरी चमकदारच आहे, असे कमलनाथ म्हणाले. काँग्रेसची कामगिरी प्रभावीच राहिली, आमचे बळ वाढले. राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली मिळालेला विजय हा काँग्रेसचा नैतिक विजय आहे, असे रेणुका चौधरी म्हणाल्या.
मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. राहुल गांधी यांच्या प्रभावी प्रचारामुळे काँग्रेसची कामगिरी सरस राहिली. आम्हाला अपेक्षित मुक्काम गाठता आला नाही; परंतु एकूण आमचा हा प्रवास चांगलाच झाला, अशी प्रतिक्रिया शशी थरूर यांनी दिली.
हा नैतिक विजय - गेहलोत
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातेत करण्यात आलेल्या प्रचाराचे हे यश असून, हा काँग्रेसचा नैतिक विजय होय, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत यांनी टिष्ट्वटवर दिली आहे.
‘ईव्हीएम’मुळे भाजपा
विजयी - संजय निरुपम
गुजरातमधील भाजपाच्या विजयामागे जनता नव्हे तर ईव्हीएम आहे, असा स्पष्ट आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. भारतीय लोकशाहीला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा मोठा धोका आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. संपूर्ण गुजरात भाजपाच्या विरोधात होता. पंतप्रधानांच्या प्रचारसभेत खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या, तरीही गुजरातमध्ये भाजपा विजयी झाले. या विजयामागे जनमत नव्हे तर ईव्हीएम आहे, असे त्यांनी टिष्ट्वटवर म्हटले आहे.
भाजपाचा आता विजय, पण २०१९ ची लोकसभा सोपी नाही-
गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपाची कामगिरी अपेक्षेपेक्षाही खाली घसरल्याचे लक्षात घेता, २०१९ मधील लोकसभा निवडणूक भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना सहजसोपी नाही, असे तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) वरिष्ठ नेत्याने सोमवारी म्हटले आहे.
टीआरएसचे लोकसभेतील सभागृह नेते ए.पी. जितेंद्र रेड्डी यांनी सांगितले की, भाजपाने मूलत: आपले प्रशासन तपासून घेतले पाहिजे. गुजरातेतील निवडणूक निकालाने भाजपाला चार पावले मागे जावे लागल्याचे मत रेड्डी यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचा दिमाखदार विजय
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे हार्दिक अभिनंदन. गुजरातमधील दिमाखदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे मोठे यश होय. भाजपाला जेमतेम गुजरातेत सत्ता राखता आली. तथापि, लवकर गुजरातच्या जनतेच्या पदरी निराशा येईल. यादव यांच्या नेतृत्वाखाली जेडीयू गटाने काँग्रेससोबत युती करून चार जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन जागा या गटाने जिंकल्या आहेत. इतर राज्यांप्रमाणे गुजराती जनताही निराश होईल.
- शरद यादव, जेडीयूचे बंडखोर नेते
भाजपाला पर्याय नाही
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन. देशात भाजपाला पर्यायच नाही. मोदी आणि शहा यांच्या संघटन कौशल्याचा हा विजय आहे.
- वसुंधरा राजे, राजस्थानच्या मुख्यमंत्री
जनतेने स्वीकारले राहुलचे नेतृत्व
गुजरात विधानसभा निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचा दावा करणाºया भाजपाला जेमतेम सत्तेचा सोपान राखता आला. गुजरातच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त करतानाच राहुल गांधी यांचे नेतृत्वही स्वीकारले आहे.
- सचिन पायलट, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष