भ्रष्टाचारातील आरोपीकडून राहुल गांधींना 62 लाखांची भेट; भाजपचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 05:10 PM2018-02-12T17:10:55+5:302018-02-12T17:15:35+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे.
बंगळुरु - कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे. काँग्रेस आपली गादी राखण्याचा प्रयत्न करत असून भाजपा कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील असेल. दोन दिवसांपासून राहुल गांधी कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत.
कर्नाटकमध्ये दोन्ही पक्षामध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टिका केली आहे. खाण घोटाळ्यात आरोपी असेल्या आमदारानं राहुल गांधीना 62 लाख रुपयांची प्रतिमा दिल्याचा आरोप भाजपानं केला आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, कर्नाटकाचे आमदार बी. नागेंद्र यांनी आता काँग्रेसचे सदस्यत्व घेतले आहे. नागेंद्र यांनी राहुल गांधी यांना सुवर्ण जडीत चांदीची एक प्रतिमा गिफ्ट दिली. त्या प्रतिमेची किंमत 62 लाख असेल्याचा आरोप भाजपानं केला आहे. नागेंद्र यांचं नाव कर्नाटकाच्या कोळसा घोटाळ्यामध्ये आलेलं आहे.
काँग्रेस अध्यक्ष भ्रष्टाचारात आरोपी असेल्या आमदाराकडून गिफ्ट घेत आहेत आणि पंतप्रधान यांच्यावर राफेलमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतायत अशी टिका भाजपाकडून केली जात आहे. राहुल गांधींना आता भ्रष्टाचारावर बोलण्याचा काही आधिकार नाही. कर्नाटकाचे भाजपा अध्यक्ष बी.एस. येदुरप्पा यांनी ट्विट करत राहुल गांधीवर निशाना साधला आहे.
Dear #ElectionHindu@OfficeOfRG, your mother, then Cong President Sonia Gandhi in an election rally in Goa in 2007, said that Congress will not allow diversion of the Mahadayi waters to Karnataka. Your silence on this issue means you endorse her views. #MahadayiSatya
— B.S. Yeddyurappa (@BSYBJP) February 11, 2018
यापूर्वी राहुल गांधी यांनी घातलेल्या महागड्या जॅकेटवरुन भाजपानं त्यांना घेरलं होतं. मेघालय निवडणुकीपूर्वी मंगळवारी (30 जानेवारी) काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शिलाँग येथे दाखल झाले होते. यावेळी तब्बल 70 हजार रुपयांच्या किंमतीचं जॅकेट परिधान करुन राहुल गांधी पार्टीच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. गेल्या वर्षी उत्तराखंडातील निवडणूक प्रचारादरम्यान एक सभेमध्ये कुर्त्यांचा फाटलेले खिसा दाखवणा-या राहुल गांधी यांनी आता एवढं महागडं जॅकेट घातल्यानं भाजपानं त्यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले होतं. महागड्या जॅकेटवरुन भाजपानं राहुल गांधींवर ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. 'राहुल यांचं सुटा-बुटातील मेघालय सरकार भ्रष्टाचाराच्या आहारी गेले आहे. आमच्याकडे उत्तर मागण्याऐवजी काँग्रेस सरकारनं स्वतःचं रिपोर्ट कार्ड दिलं पाहिजे', असे ट्विट भाजपानं केले आहे होतं.
भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच, कर्नाटकात राहुल गांधी यांची टीका
भाजपा हा खोटे बोलणा-या मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचारात केली.
कर्नाटकातील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी तिथे काँग्रेस व भाजपा दोघांनीही प्रचार सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊ न कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याचा थेट उल्लेख न करताच, सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या अनेक विकास कामे व योजनांविषयी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाने दिलेली आश्वासने कशी खोटी ठरली, हे नमूद केले.