"मोदींनी शपथ घेण्याआधीच २४ लाख विद्यार्थ्यांना..."; NEET परीक्षेवरुन राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 12:29 PM2024-06-09T12:29:15+5:302024-06-09T12:32:40+5:30

Rahul Gandhi on NEET : नीट परीक्षेच्या निकालावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi accused of rigging in National Eligibility and Entrance Test Exam | "मोदींनी शपथ घेण्याआधीच २४ लाख विद्यार्थ्यांना..."; NEET परीक्षेवरुन राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

(प्रातिनिधीक छायाचित्र)

NEET Exam Scam: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विद्यार्थी, पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर अनेक आरोप करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १५०० हून अधिक विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आता राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि एनडीए सरकारवर निशाणा साधलाय. नरेंद्र मोदींनी अद्याप शपथही घेतली नाही आणि दुसरीकडे नीट परीक्षेतील हेराफेरीने २४ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्यात आलंय, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे.

नीट परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारावरुन देशभरातल्या विद्यार्थ्यांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे. परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे याची सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली. भ्रष्टाचार झाल्याने ही परीक्षाच तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात येत होती. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत मोदींवर टीका केली.

"नरेंद्र मोदींनी अद्याप शपथही घेतली नाही आणि नीट परीक्षेतील हेराफेरीने २४ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. एकाच परीक्षा केंद्रातील ६ विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून अव्वल आले आहेत. किती जणांना असे गुण मिळालेत जे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. परंतु सरकार सातत्याने पेपर फुटण्याची शक्यता नाकारत आहे. शिक्षण माफिया आणि सरकारी यंत्रणा यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या 'पेपर लीक इंडस्ट्री'ला तोंड देण्यासाठी काँग्रेसने ठोस योजना आखली होती. आमच्या जाहीरनाम्यात कायदा करून विद्यार्थ्यांना पेपरफुटीपासून मुक्त करण्याचा संकल्प केला होता. आज मी देशातील सर्व विद्यार्थ्यांना आश्वासन देतो की मी संसदेत तुमचा आवाज बनेन आणि तुमच्या भविष्याशी संबंधित मुद्दे जोरदारपणे मांडेन. तरुणांनी इंडियावर विश्वास व्यक्त केला आहे. इंडिया त्यांचा आवाज दाबू देणार नाही," असे राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या परीक्षेच्या निकालावरुन नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर अनेक आरोप केले जात आहेत. बऱ्याच प्रकरणांमध्ये,नीटच्या निकालात अनियमितता असल्याचा संशय आहे, ज्यामध्ये पेपर फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी पहिल्यांदाच जास्त गुण मिळवणे, नोटिफिकेशन न देता ग्रेस मार्क्स देणे, गुण आणि रँकमधील अनियमितता इत्यादींचा समावेश आहे. एनटीएने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यामागचे कारण स्पष्ट केले असले तरी विद्यार्थी आणि तज्ज्ञ त्यावर समाधानी नाहीत.
 

Web Title: Rahul Gandhi accused of rigging in National Eligibility and Entrance Test Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.