...असा कारनामा करणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; राहुल गांधींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 07:23 PM2018-06-04T19:23:09+5:302018-06-04T19:23:09+5:30

मोदींच्या सिंगापूर दौऱ्यातील मुलाखतीवर राहुल गांधींचं मिश्किल भाष्य

Rahul Gandhi accuses PM Modi of giving scripted answers | ...असा कारनामा करणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; राहुल गांधींचा टोला

...असा कारनामा करणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; राहुल गांधींचा टोला

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वत्कृत्वावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. सिंगापूरच्या नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील मोदींची मुलाखत स्क्रिप्टेड होती, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. 1 जून रोजी सिंगापूरमध्ये मोदींची मुलाखत झाली. यावेळी उपस्थितांना थेट प्रश्न विचारले होते. 

मोदींच्या सिंगापूर दौऱ्यातील मुलाखतीवर राहुल गांधींनी जोरदार निशाणा साधला आहे. 'लोकांनी उत्स्फूर्तपणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. विशेष म्हणजे मोदी काय उत्तरं देणार, हे त्यांच्या दुभाषकाला आधीच माहित होतं,' असा चिमटा राहुल यांनी काढला. 'बरं झालं, मोदींना खरंच लोकांनी थेट उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली नाहीत, अन्यथा मोदींसमोर पेचप्रसंग निर्माण झाला असता,' असं राहुल यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. 

'मोदी देशाचे पहिले असे पंतप्रधान आहेत, ज्यांनी लोकांच्या उत्स्फूर्त प्रश्नांना उत्तरं दिली आणि ती उत्तरं त्यांच्या दुभाषकाला (ट्रान्सलेटरला) माहित होती. ते खरोखरच लोकांच्या उत्स्फूर्त प्रश्नांना सामोरे गेले नाहीत, हे खूप बरं झालं. नाहीतर ती आपल्या सर्वांसाठीच मोठी नामुष्की ठरली असती,' असं ट्विट करत राहुल गांधींनी त्यासोबत सिंगापूरमधील मुलाखतीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडीओदेखील जोडला आहे. 





मोदींच्या वत्कृत्वाची अनेकदा प्रशंसा केली जाते. मात्र मोदींच्या सिंगापूरमधील मुलाखतीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. उपस्थितांनी मोदींना उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारायचे आणि मोदींनी त्या प्रश्नांना उत्तरं द्यायची, असं या मुलाखतीचं स्वरुप होतं. यावेळी मोदींना आशिया खंडासमोरच्या आव्हानांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मोदींनी उत्तर दिल्यावर त्याचं इंग्रजीत भाषांतर होणं अपेक्षित होतं. मात्र मोदींच्या दुभाषकानं सांगितलेली काही माहिती आणि आकडेवारी ही मोदींच्या उत्तरातच नव्हती. त्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम स्क्रिप्टेड होता की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

Web Title: Rahul Gandhi accuses PM Modi of giving scripted answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.