राहुल गांधी आणि अखिलेश यादव रामललाच्या दर्शनाला जाणार?; अजय राय यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:46 IST2024-06-10T13:41:49+5:302024-06-10T13:46:41+5:30
Rahul Gandhi And Akhilesh Yadav : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे.

राहुल गांधी आणि अखिलेश यादव रामललाच्या दर्शनाला जाणार?; अजय राय यांचा मोठा दावा
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. राहुल आणि अखिलेश यांच्या रामललाच्या दर्शनाशी संबंधित प्रश्नावर काँग्रेसच्या यूपी युनिटचे अध्यक्ष अजय राय यांनी भाष्य केलं आहे. "कोणीही कधीही देवाच्या दर्शनासाठी जाऊ शकतो. जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते जातील."
"दर्शन, पूजा यांचं मार्केटिंग होत नाही. हा आपल्या श्रद्धेचा विषय आहे. राहुल गांधी यांनी रायबरेलीतून खासदार राहावं, ही उत्तर प्रदेशातील जनतेची मागणी आहे कारण जनतेने त्यांना समर्थन दिलं आहे" असं उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय राय यांनी म्हटलं आहे.
अमेठी फुरसातगंजमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत अजय राय यांनी राहुल गांधी, अखिलेश यादव, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्या सहभागावर सांगितलं की, "आभार कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची प्रत्येकाची इच्छा आहे."
राहुल गांधी अमेठीतून खासदारपदी कायम राहण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "राहुल गांधी यांनी रायबरेलीचे प्रतिनिधित्व करावे अशी आपली सर्वांची इच्छा आहे. रायबरेलीच्या जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलं असून ते त्यांचं कौटुंबिक स्थान आहे."
"सर्व जातींची मतं मिळाली आहेत. गरीब, शेतकरी, बेरोजगार, तरुण या सर्वांनी मतदान केलं. बीएचयूमध्ये मुलीवर बलात्कार झाला होता. या सर्व गोष्टी पाहून जनतेने आम्हाला साथ दिली" असं उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीच्या विजयाबाबत अजय राय यांनी म्हटलं आहे.