संभलमधील हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांची राहुल आणि प्रियंका गांधी यांनी घेतली भेट, न्याय मिळवून देण्याचं दिलं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 21:34 IST2024-12-10T21:34:13+5:302024-12-10T21:34:59+5:30
Sambhal Violence: संभलमधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज दिल्लीमध्ये भेट घेतली. तसेच त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.

संभलमधील हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांची राहुल आणि प्रियंका गांधी यांनी घेतली भेट, न्याय मिळवून देण्याचं दिलं आश्वासन
संभलमधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज दिल्लीमध्ये भेट घेतली. तसेच त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. या भेटीवेळी दोन्हीकडून मोबाईल क्रमांकांची देवाण घेणाव झाली. तसेच पीडितांनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती राहुल आणि प्रियंका गांधी यांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार पाच कुटुंबांतील सदस्य राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना भेटण्यासाठी पोहोचले होते.
या भेटीवेळी काँग्रेसचे नेते रिझवान कुरेशी, सचिन चौधरी आणि प्रदीप नरवाल हे उपस्थित होते. तत्पूर्वी राहुल गांधी मागच्या आठवड्यात संभलमध्ये पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघाले होते. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना राज्यात प्रवेश करू दिला नव्हता. त्यानंतर ते दिल्लीला माघारी परतले होते.
संभल जिल्ह्यात २४ नोव्हेंबर रोजी स्थानिक कोर्टाच्या आदेशानुसार शाही जामा मशिदीच्या सर्व्हेक्षणास सुरुवात झाल्यावर हिंसाचार उफाळून आला होता. तसेच त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. जखमींमध्ये काही पोलिसांचाही समावेश होता. या प्रकरणी पोलिसांनी अडीच हजारांहून अधिक लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील बहुतांश अज्ञात आहेत. त्याशिवाय समाजवादी पार्टीचे संभल येथील खासदार जिया उर रहमान बर्क आणि संभल येथील आमदार इक्बाल महमूद आणि त्यांचा मुलगा सोहेल इक्बाल यांचा समावेश आहे.