सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने, “काँग्रेस नेत्यांनी वादात पडू नये”; राहुल गांधींच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 11:55 AM2023-09-17T11:55:50+5:302023-09-17T11:58:50+5:30
CWC Meeting: सनातन धर्माच्या वादाबाबत बोलल्यास काँग्रेसचे नुकसान होईल आणि याचा भाजपला फायदा होईल, असे मत पक्षातील काही नेत्यांनी मांडले.
CWC Meeting: गेल्या काही दिवसांपासून सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधाने होताना पाहायला मिळत आहे. आधी डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता. त्याचे पडसाद देशभरात उमटल्याचे दिसले. यानंतर बिहारच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह विधान केले. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. यानंतर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पक्षातील नेत्यांनी सनातन धर्माबाबत सुरू असलेल्या वादात न पडण्याच्या स्पष्ट सूचना केल्याची माहिती देण्यात आली आहे.
हैदराबाद येथे काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सनातन धर्मावर सुरू असलेल्या वादावरही चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या काही नेत्यांनी या प्रकरणी सावधगिरी बाळगण्याचे आणि भाजपच्या अजेंड्यात अडकू नका असे आवाहन केले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह काही नेत्यांनी या बैठकीत पक्षाने अशा मुद्द्यांपासून दूर राहावे आणि त्यात अडकू नये, असे सांगितले.
काँग्रेस नेत्यांनी वादात पडू नये, राहुल गांधींच्या स्पष्ट सूचना
मिळालेल्या माहितीनुसार, सनातन धर्माबाबतच्या वादग्रस्त विधानांसंदर्भात काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पक्षातील नेत्यांना स्पष्ट सूचना केल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांना सनातनच्या वादात पडू नये. यात अडकण्यापेक्षा गरीब कल्याण आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पक्षाने कोणत्याही जातीचा विचार न करता गरिबांचे प्रश्न मांडले पाहिजेत, असे राहुल गांधी यांनी सांगितल्याचे म्हटले जात आहे. भूपेश बघेल आणि दिग्विजय सिंह या दोघांनी सनातन धर्म वादावर बोलल्याने पक्षाचे नुकसान होईल आणि भाजपला फायदा होईल, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, सर्व धर्मांचा आदर करण्यावर पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले आहे की, काँग्रेस पक्षाने सनातन धर्माच्या मुद्द्यावर कोणत्याही वादात पडू नये. द्रमुकच्या बाजूने बोलत नाही. द्रमुकने म्हटले आहे की. ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. तो जातीय दडपशाही आणि महिला तसेच दलित अत्याचार यांसारख्या जातिव्यवस्थेच्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी दिली.